
बीड : मुलीला क्लासमध्ये उभं केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांनी थेट शिक्षकालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी इथल्या वैद्यनाथ फिजिओथेरपी इन्स्टिट्यूटमध्ये (Vaidyanath Physiotherapy Institute) हा प्रकार घडला. ही घटना २८ ऑगस्टची असून, याचं सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या इन्स्टिट्यूटमधील शिक्षक डॉ. जहीर अहमद मोहम्मद इस्माईल यांनी आपल्या मुलीला मुद्दामहून क्लासमध्ये उभं केलं, असा आरोप करत एक पालक कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी जाब विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त बाचाबाची झाली, पण काही वेळातच या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, शिक्षक आणि एक व्यक्ती यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. त्यानंतर दुसरा एक जण तिथे येतो आणि थेट शिक्षकांना मारहाण सुरू करतो. तो व्यक्ती शिक्षकाच्या कानशिलात लगावतो आणि त्यांना धक्काबुक्की करतो. यावेळी तिथे उपस्थित असलेले इतर लोक आणि ती विद्यार्थिनीसुद्धा भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही किंवा कोणाला अटकही करण्यात आलेली नाही. मात्र, महाराष्ट्रात डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच हा प्रकार घडला आहे.
काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका रुग्णाच्या मुलाने ऑर्थोपेडिक डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये मारहाण केली होती. आता बीडमधील या घटनेमुळे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून, सोशल मीडियावरून अनेकजण यावर आपली मतं मांडत आहेत.