Ekvira Devi Yatra : लोणावळ्यात एकविरा देवी यात्रा सुरू; भाविकांसाठी मोठा दिलासा, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 3 दिवस टोलमाफी

Published : Mar 24, 2026, 08:30 AM IST
ekvira Devi Yatra

सार

Ekvira Devi Yatra : लोणावळ्यातील एकविरा देवीची चैत्री यात्रा आजपासून सुरू झाली असून, तीन दिवस चालणार आहे. भाविकांसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त पोलीस बंदोबस्त, वाहतूक बदल आणि कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

Ekvira Devi Yatra : लोणावळ्यातील एकविरा देवी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्री यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. आगरी-कोळी बांधवांची कुलदेवता असलेल्या एकविरा आईच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यंदा भाविकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन दिवस टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 3 दिवस टोलमाफी

या यात्रेनिमित्त भाविकांना सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी पुढाकार घेत टोलमाफीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसांसाठी ही टोलमाफी लागू असेल. मात्र, यासाठी खासदारांच्या कार्यालयातून संमतीपत्र घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. भाविकांनी सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यात्रेनिमित्त प्रशासन सतर्क, कडक सुरक्षा व्यवस्था

यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी मावळ प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, परिसरात सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सतर्क आहेत.

वाहतूक व्यवस्थेत बदल, जड वाहनांना बंदी

भाविकांची गर्दी लक्षात घेता कार्ला फाटा ते गडपायथा दरम्यान जड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. पायऱ्या मोकळ्या राहाव्यात यासाठी हार-फुलांच्या दुकानांना मागे हलवण्यात आले आहे.

फटाक्यांवर बंदी, भाविकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

यात्रेदरम्यान गडावर फटाके नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. शोभेचे किंवा रंगीत फटाकेही नेण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक उत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावा यासाठी प्रशासनाने भाविकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर 'दुहेरी' संकट! एका बाजूला कडक उन्हाळा, तर दुसरीकडे अवकाळीचा इशारा; 'या' १० जिल्ह्यांना यलो अलर्ट
Pune Eatery: 'नारंगी केसांच्या माणसा'मुळे दरवाढ; पुण्यातल्या रेस्टॉरंटची नोटीस व्हायरल!