
पुणे: पुण्यातल्या एका रेस्टॉरंटमधील दरवाढीची सूचना सध्या व्हायरल झाली आहे. पण ही दरवाढ झाल्यामुळे नाही, तर दरवाढीमागे दिलेल्या कारणामुळे. कोथरूडमधील एका रेस्टॉरंटने दरांमध्ये झालेल्या बदलाची माहिती देण्यासाठी एक अशी भन्नाट नोटीस लावली, की ती पाहून इंटरनेटवर धुमाकूळ उडाला. 'बर्वे दहीवडा' नावाच्या या रेस्टॉरंटने लावलेल्या नोटीसमध्ये जागतिक घडामोडींना स्थानिक दरवाढीशी जोडत एक गमतीशीर टोला लगावला आहे, जो वाचून ग्राहक चक्रावलेही आणि त्यांना हसूही आवरलं नाही. या नोटीसमध्ये थेट नाव घेतलं नसलं तरी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे इशारा असल्याचं स्पष्ट दिसतंय.
या नोटीसमध्ये लिहिलं आहे, “एका नारंगी केसांच्या मूर्ख माणसाने नुकतंच एक युद्ध सुरू केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणून LPG आणि प्लास्टिकचे दरही वाढले आहेत. त्यामुळे, २१ मार्चपासून नवीन दर लागू होतील. कृपया सहकार्य करा किंवा युद्ध थांबवण्यासाठी मदत करा.”
या नोटीसमधील भाषेमुळे ती लक्ष वेधून घेत असली तरी, लहान व्यावसायिकांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या एका गंभीर समस्येवरही यातून बोट ठेवलं गेलं आहे.
एका युझरने लिहिलं, "युद्ध थांबवायला मदत कशी करायची? 😂" दुसऱ्या युझरने म्हटलं, “विश्वगुरू है, तो मुमकिन है ;)” तर तिसऱ्याने विचारलं, “LPG पुरवठा सामान्य झाल्यावर ते दर कमी करतील का?”
“ज्याने कोणी ही नोटीस लिहिली आहे त्याला पूर्ण मार्क… 👏👏👏” अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने दिली.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा LPG गॅसचे दर वाढतात. याचा थेट फटका रेस्टॉरंट्सना बसतो, कारण त्यांचा रोजचा व्यवसाय याच गॅसवर अवलंबून असतो.
गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियातील युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. याचा परिणाम रोजच्या खर्चावर दिसून येत आहे. LPG दरात होणारी छोटीशी वाढसुद्धा लहान रेस्टॉरंट्सच्या नफ्यावर मोठा परिणाम करते, ज्यामुळे त्यांना मेन्यूमधील पदार्थांचे दर वाढवावे लागतात.