राम मंदिरावरून ठाकरेंना शिंदेंचा पलटवार; 'सिद्धिविनायक प्रकरणाची चौकशी का झाली नाही?' म्हणत उपस्थित केला प्रश्न

Published : Jul 11, 2026, 02:02 PM IST
bmc election results 2026 shiv sena ubt vs eknath shinde mayor politics

सार

अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. दोषींवर कठोर कारवाई होईल, असे सांगतानाच त्यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित अनियमिततेच्या प्रकारावरुन भाष्य केले. 

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. राम मंदिरातील कथित गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट केले. त्यासोबत एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. तत्कालीन सरकारने या प्रकरणाची चौकशी का केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

राम मंदिर प्रकरणात दोषींवर कारवाई होणार

विधान परिषदेतील चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिरातील कथित गैरव्यवहारामुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले.

सिद्धिविनायक मंदिराचा मुद्दा उपस्थित

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आज राम मंदिरावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या देणगीपेटीत कथित गैरव्यवहार केला होता. त्यावेळी सत्तेत असलेल्या सरकारने चौकशीचे आदेश का दिले नाहीत, असा प्रश्नही एकनाथ शिंदे यांनी विचारला.

आदेश बांदेकरांचे प्रत्युत्तर

शिंदे यांच्या वक्तव्यानंतर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारात आपण दोषी आढळल्यास मंदिरासमोर फाशी द्यावी, असे आदेश बांदेकर यांनी म्हटले. आपल्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या संबंधित आरोप यापूर्वीही उपस्थित करण्यात आले होते, असेही बांदेकर म्हणाले.

दस्तऐवजांमध्ये छेडछाडीची शक्यता?

आदेश बांदेकर यांनी सांगितले की, ट्रस्टच्या कामकाजाशी संबंधित अधिकारी शासनाकडून नियुक्त केले जातात. जर कोणतीही अनियमितता झाली असेल तर ती त्याचवेळी उघड व्हायला हवी होती. गेल्या तीन वर्षांपासून ट्रस्टची जबाबदारी इतरांकडे असून या काळात काही कागदपत्रांमध्ये छेडछाड झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

आपल्या भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. काही लोक मारुती स्तोत्र लिहून वाचतात. पण खासदार श्रीकांत शिंदे हनुमान चालीसा न पाहता म्हणू शकतात. याशिवाय रामायण आणि हनुमानाशी संबंधित काही वक्तव्यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली.

'राम रक्षा' आंदोलन

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ राज्यभर 'राम रक्षा' आंदोलन छेडले होते. त्यानंतर हा मुद्दा विधानमंडळातही गाजला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक