
अमरावती: “सामाजिक कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा देता येते,” या प्रेरणादायी विचारातून दरवर्षी दिला जाणारा E.C.E. मानव सेवा ऊर्जा पुरस्कार 2025 साठी सज्ज झाला आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था, संघटना किंवा व्यक्तींना गौरवण्यासाठी हा पुरस्कार E.C.E. इंडिया फाउंडेशन तर्फे दिला जातो.
गेल्या वर्षीचा पुरस्कार "उत्कर्ष शिशुगृह आणि गायत्री बालिकाश्रम, अकोला" या संस्थांना प्रदान करण्यात आला होता. हा सन्मान पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते दिला गेला होता, ज्यामुळे कार्यक्रमाची प्रतिष्ठा अधिकच वाढली होती.
या वर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ डिसेंबर 2025 मध्ये अमरावती शहरात भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. सदर पुरस्कारासाठी पात्र मानकऱ्यांची निवड करण्यासाठी एक सक्षम आणि निष्पक्ष निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे.
सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि निःस्वार्थ सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी या निवड समितीत स्थान मिळवले आहे. सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे श्री. अनंत कौलगीकर, डॉ. श्री किशोर फुले (नवीन नियुक्त सदस्य), डॉ. श्री अविनाश मोहरील, सौ. आरती आमटे-नानकर, श्री. शेखर जोशी, श्री. स्वप्निल चांदणे, डॉ. किशोर फुले यांची यंदा नव्याने अतिरिक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ समितीच्या निर्णय प्रक्रियेत मिळणार आहे.
E.C.E. मानव सेवा पुरस्काराचा उद्देश सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा आहे. हे पुरस्कार फक्त सन्मानापुरते मर्यादित नसून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रेरणा म्हणून काम करतात.