
Nagpur Gudhi Padwa 2026 : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नागपुरात हजारो नागरिकांसोबत गुढीपाडवा साजरा करत त्यांनी या सणाचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही हिंदू नववर्षाची पवित्र पहाट आहे. संपूर्ण वातावरण भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे आणि ‘जय श्री राम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.” त्यांनी सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
फडणवीस यांनी आपल्या संदेशात गुढीचे महत्त्व सांगताना ती भारताच्या अभिमानाचे आणि विजयाचे प्रतीक असल्याचे नमूद केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने पुढे जात राहो, आणि ही गुढी दरवर्षी अधिक उंच फडकत राहो, अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली.
नागपुरात हजारो नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून सण साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या उत्सवात सहभागी झाले आणि नागरिकांसोबत आनंद साजरा केला. यावेळी शहरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक उत्सवाची रेलचेल पाहायला मिळाली.