उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार असल्याचे वक्तव्य केले. यामुळे नाराजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नागपूर : आज नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, असे वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार यांच्या या फॉर्म्युल्यामुळे कदाचित नाराजांच्या आशा पल्लवित होतील.
महायुतीच्या मंत्र्यांचा आज नागपूर येथे थोड्याचवेळात शपथविधी होईल. या मंत्रिमंडळात काही जुने चेहरे आहेत तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काहींना वगळण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर पण उमटत आहेत. त्याचे पडसाद पण काही दिवसात उमटतीलच. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
"ज्या वेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस दीड वर्षांची कारकिर्द ही काहींना मिळाली. या पाचवर्षांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही असं ठरवल आहे की, अडीच अडीच वर्षांसाठी काहींना संधी द्यायची. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्या मध्ये सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. याबाबतीत तिन्ही पक्षात एकवाक्यता झाली आहे" असे अजित पवार म्हणाले.