चित्रा वाघांचा शरद पवारांना इशारा, 'कच्चे खेळाडू पाठवू नका'

चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना थेट इशारा दिला असून 'असे कच्चे खेळाडू पाठवू नका, तोंडावर पडाल' असे म्हटले आहे. त्यांनी गेल्या २० वर्षात राष्ट्रवादीने त्यांना काहीही दिले नसल्याचा आरोप केला आहे.

Rameshwar Gavhane | Published : Jul 30, 2024 11:55 AM IST

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत असताना चित्रा वाघ यांनी आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाच थेट इशारा दिला आहे. पवार साहेब तुमच्या या गँगला आवरा, असे कच्चे खिलाडी पाठवू नका अन्यथा तोंडावर पडाल असं चित्रा वाघ म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी माझी नाव 100 लोकांसोबत जोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यामध्ये चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्या सून गौरी चव्हाण यांचे संभाषण समोर आले. चित्रा वाघ यांनी आपल्या घरात भांडणं लावली असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. तर माझी मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका नाहीतर पवारसाहेबांना त्रास होईल असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

गेल्या 20 वर्षांत पवारांनी मला काय दिले?

20 वर्षांमध्ये पायाचे कातडे काढून पक्षाला दिले, पण शरद पवारांनी आपल्याला काय दिले असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला. त्या म्हणाल्या की, पवारसाहेब आणि बारामतीच्या ताईंना माझ्या कामाची उजळणी होईल. चित्रा वाघमध्ये काहीतरी क्वॉलिटी आहे म्हणून संधी मिळाली. गेल्या 20 वर्षात त्यांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडली. काय परिणाम होतील याची काळजी न करता मी जबाबदारी पार पाडली. कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चित्रा वाघला 20 वर्षांत एकही लाभाचे पद दिले नाही.

तुमच्या गँगला आवरा, पवारसाहेब

चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना इशारा दिला. त्या म्हणाल्या की, पवारसाहेब याने तुम्हाला वाटत असेल की माझ्यावर दबाव येईल, चित्रा वाघचा आवाज दाबला जाईल तर तसे होणार नाही. पवारसाहेब असे कच्चे खिलाडी पाठवू नका, तोंडावर पडाल.

पवारसाहेबांवर मी बापासारखं प्रेम केले, पण त्याबदल्यात तुम्ही काय दिले असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. त्या म्हणाल्या की, कुठूनतरी कसेतरी गोत्यात आणायचे काम करताय ना ते थांबवा. 20 वर्षे तुमच्या पक्षात होते. तुम्ही माझ्या परिवाराला गोत्यात आणायचे काम केले. मी सगळे सहन केले. अशा किती बायका माझ्याविरोधात उभ्या कराल? माझे नाव 100 लोकांसोबत जोडले. आता या बाईला उभे केले. तुमच्याकडे ही गौरी चव्हाण आली असती तर काय केले असते? कुणीही महिला अडचणीत आली तर मी तिला सहकार्य करणारच.

Share this article