रील्सच्या नादात जीव धोक्यात!

Published : Jul 30, 2024, 01:18 PM ISTUpdated : Jul 30, 2024, 01:23 PM IST
Deaths happened while making reels

सार

रील्स बनवण्याच्या नादात तरुणाई जीव धोक्यात घालत आहे. अपघात, मृत्यू आणि अपंगत्वाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पालकांनी याकडे लक्ष देऊन मुलांना याबाबत जागरूक करणे गरजेचे आहे.

रील बनवण्यासाठी आणि काही तरी हटके करण्याच्या नादात तरुणाई जिवाशी खेळताना सद्या पाहायला मिळत आहे. सद्या रील्सच्या नादात अपघात होणे, जीव जाणे, कायमचे अपंगत्व येणे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पण सध्या ते व्यसन होऊन बसले असून गंभीर बाब म्हणजे आपली मुले रील करतात हे त्यांच्या पालकांना माहीत असते. तरीही पालकांकडून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले जात नाहीत असे दिसते. गेल्या काही दिवसात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

मुंबई लोकलमध्ये स्टंटबाजी करताना तरुणाने गमावले हात-पाय

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. एक युवक मुंबईतील शिवडी स्टेशनवर स्टंट करत होता. रेल्वेच्या सुरक्षा दलाने तो व्हिडीओ पाहून त्या युवकाविरोधात वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर आरपीएफला त्याचा शोध घेण्यात यश आले असून त्यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली. हा युवक रील्ससाठी मशीद बंदर स्टेशनमध्ये स्टंट करताना दुर्घटना घडली आणि त्यात त्याने एक हात आणि एक पाय गमावला आहे. ही घटना 14 जुलैची असून त्या युवकाचे नाव आहे फरहत आझम शेख.

रीलच्या नादात 300 फूट खोल दरीत पडून रील स्टार अन्वी कामदारचा मृत्यू

मुंबईतील ट्रॅव्हल व्लॉगर म्हणून अन्वी कामदार सोशल मीडियावर लोकप्रिय होती. तिच्या रील्सना लाईक्स करणारे तिचे हजारोंच्या संख्येने फॉलोअर होते. 17 जुलैला रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील कुंभे धबधब्यावर रील्स बनवण्याच्या नादात ती 300 फूट दरीत कोसळली आणि त्यातच तिचा अंत झाला. विशेष म्हणजे ती पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट होती. म्हणजेच उच्चशिक्षित होती.

रीलसाठी शूट सुरू असतानाच कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये रील्सच्या वेडेपणात एक जीव गेलाय. कार चालवता येत नसतानाही कार रिव्हर्स घेत असतानाचा रील तिला बनवायचा होता. मित्राच्या कारमध्ये ती रील करत होती. पण रीलसाठी शूट सुरू असतानाच तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली. जीवाला मुकलेल्या या 23 वर्षांच्या तरुणीचे नाव होते श्वेता दीपक सुरवसे.

पाथरीमध्ये रील बनवण्याच्या नादात दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये चार विद्यार्थी प्रजासत्ताक दिनासाठी शाळेत जात होते. नववीतील हे चौघे दुचाकीवरून जात असताना ते मोबाईलमध्ये रील बनवत होते. त्याच नादात त्यांच्या दुचाकीला दुसर्‍या गाडीने धडक दिली आणि एका विद्यार्थ्याचा हात तुटून रस्त्यावर पडला. या दुर्घटनेत दोन शाळकरी मुलांचा जीव गेला. गेल्या वर्षी 26 जानेवारीची ही घटना आहे.

पानिपतच्या समलखामध्ये रीलच्या नादात कारचा अपघात, अनेकजण गंभीर जखमी

हरियाणाच्या पानिपतमधील एक वर्षापूर्वीची ही घटना आहे. रील तयार करण्यासाठी एक युवक स्टेअरिंग सोडून कार वेगाने चालवत होता. रीलकडे लक्ष देण्याच्या नादात अचानक त्याच्या गाडीने लागोपाठ पाच वाहनांना जोरदार धडक दिली. यात अनेकजण गंभीर जखमी झाले होते. शिवाय सर्व गाड्यांचे नुकसानही झाले. पानिपतच्या समलखा शहरातील ही दुर्घटना आहे.

या सर्व घटनांवरुन असे दिसते की, आजची युवा पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेले असून रील्स करणे हा जणूकाही त्यांच्या जीवनमरणचा प्रश्न बनला आहे. असे त्यांना वाटते. पहिल्या घटनेतील फरहत आझम शेख हा कायमचा अपंग झाला असून त्याला आता त्याच्या सर्व कामासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागणारय. तर चार्टर्ड अकाऊंटंट झालेली अन्वी कामदार जीवाला मुकली. तर श्वेता सुरवसे हिनेही रीलच्या नादात आपला जीव गमावला असून इतर अनेकांबाबत अशा दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे त्यांच्या पालकांची अवस्था कशी होत असेल, याचा विचार सर्वांनी करायला हवा. आपला जीव किती लाख मोलाचा आहे त्याचाही विचार करायला पाहिजे.

आणखी वाचा :

पिंपरी चिंचवडमध्ये 'ब्लू व्हेल'च्या नादात मुलाने इमारतीवरुन उडी घेत संपवलं जीवन

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!