
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. "चार मंत्री घरच्या वाटेला लागणार आहेत," असा दावा त्यांनी रविवारी आपल्या ट्विटमध्ये केला होता. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल टोला लगावत संजय राऊतांना डिवचलं आहे.
आज द्वारका सर्कल परिसराचा आढावा घेतल्यानंतर बोलताना भुजबळ म्हणाले, “आता आम्ही सुद्धा घरी चाललोय!” त्यांच्या या उपरोधिक प्रतिक्रियेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
भुजबळ यांनी पुढे बोलताना वाहतूक व्यवस्थेतील अडचणींबाबत स्पष्ट मत मांडलं. “संपूर्ण जबाबदारी ट्रॅफिक पोलिसांवर आहे. अडचणी काही फारशा मोठ्या नाहीत. थोडं प्रशिक्षण दिलं, तर या समस्या सुटू शकतात. मोठमोठे पूल, पिलर्स यामुळे रस्ता थोडा बदलावा लागेल, पण हे शक्य आहे,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं, “फडणवीस मंत्रिमंडळात रम-रमी-रमा-रमणी! मी सध्या दिल्लीत आहे. चार मंत्री घरी जाणार, पाचवा गटांगळ्या खात आहे. अमित शहा यांनी निर्णायक पावलं उचलली असून, महाराष्ट्रात लवकरच मोठ्या घडामोडी घडतील.” या विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
त्याचवेळी सभागृहात माणिकराव कोकाटे रमी खेळताना आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “विरोधकांची ती भूमिका आहे, पण त्यावर मी काही बोलणार नाही. मला फारशी माहितीही नाही.”
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोरच कार्यकर्त्यावर झालेल्या मारहाणीच्या प्रकाराबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, “मला याबद्दल काही माहिती नाही. जे काही घडलं, ते मी फक्त ऐकूनच जाणलं.”