
पुणे - “व्यावसायिक लष्करी दलं पराभवांनी खचत नाहीत. युद्धामध्ये क्षणिक अडथळे येतात, पण अंतिमतः विजय ठरवतो तो मनोधैर्य आणि रणनीती.” हे शब्द आहेत भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांचे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात ‘Future Wars and Warfare’ या विषयावर बोलताना त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई कारवाया केल्या त्यानंतर, ७ मे रोजीच्या प्रारंभिक टप्प्यात भारतीय हवाई दलाला काही नुकसान सहन करावे लागले, याची त्यांनी मोकळेपणाने कबुली दिली. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, “नुकसान हे युद्धाचा भाग असते, पण अंतिम परिणाम काय साधला गेला, हे अधिक महत्त्वाचे आहे.”
"धैर्य टिकवा, चुका सुधारून पुन्हा उभे रहा" “प्रोफेशनल फोर्सेस कधीच पराभवामुळे खचत नाहीत. मनोधैर्य टिकवून ठेवणे ही विजयाची पहिली पायरी आहे. आपण जेव्हा अडचणीत येतो, तेव्हा त्या अनुभवातून शिकून, आपली रणनीती सुधारून पुढे जाणे हेच व्यावसायिकतेचे लक्षण आहे,” असे ते म्हणाले.
जनरल चौहान यांच्या मते, लष्कराची खरी ताकद म्हणजे त्याची जुळवून घेण्याची क्षमता (adaptability). ऑपरेशन सिंदूर दरम्यान सुरुवातीला झालेल्या नुकसानानंतर, भारतीय दलांनी त्वरित रणनीतीत बदल केला आणि सीमेपारच्या लष्करी हवाई तळांवर निर्णायक फटके दिले. यामुळे पाकिस्तानला शांततेसाठी पुढे यावे लागले, असे ते सूचित करतात.
"दहशतवाद आणि अण्वस्त्रांच्या छायेखाली भारत कधीच जगणार नाही" सीडीएस चौहान यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर कठोर भाष्य करताना सांगितले की, “पाकिस्तानने भारताला दहशतवादी कारवाया आणि अण्वस्त्रांचा वापर सूचित करून गृहीत धरू नये. आपण आता अशा छायेखाली जीवन जगणार नाही.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूरची भूमिका फक्त सैनिकी नव्हती, तर ती एक राजनैतिक आणि नीतीप्रधान ठराव होती. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला उत्तर देण्याची आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेला तडा जाणार नाही, याची खात्री करण्याची ही जबाबदारी भारताने उचलली.
पहलगाम घटनेचा तीव्र निषेध २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निःशस्त्र नागरिकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा उल्लेख करताना त्यांनी तीव्र भावना व्यक्त केली. “त्या कुटुंबीयांना त्यांच्याच डोळ्यासमोर गोळ्या घालून मारण्यात आले. धर्माच्या नावाखाली अशा क्रौर्याचा कोणताही आधुनिक समाज स्वीकार करू शकत नाही,” असे ते म्हणाले.
ही घटना केवळ मानवी हक्कांचा भंग नव्हता, तर भारतीय समाजाच्या सहिष्णुतेच्या मूळ गाभ्यावर घाव होता, अशी त्यांची भूमिका होती.
"ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, ही केवळ तात्पुरती शांतता" CDS चौहान यांनी अत्यंत स्पष्टपणे म्हटले की, "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही." सद्यस्थिती ही केवळ तात्पुरती शांतता आहे आणि लष्कराने आपले रक्षण ढिले करू नये.
त्यांच्या मते, भारताला दीर्घकालीन संघर्षात अडकण्याची इच्छा नव्हती. ऑपरेशन प्राक्रमनंतर ९ महिन्यांची सीमा सज्जता, त्यातून होणारा खर्च व तणाव लक्षात घेता, यावेळी थोडक्याच काळात निर्णायक कारवाई करणे हे सरकारचे धोरण होते.
पाकिस्तानला संवादाची गरज का भासली? जनरल चौहान यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय दलांच्या मारक कारवायांमुळे पाकिस्तानला मोठे नुकसान होऊ लागले होते. विशेषतः लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रणालींचा भारताकडे असलेला प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ लक्षात घेता, पाकिस्तानने लवकरात लवकर युद्धविरामाची मागणी केली.