मुठा नदीवरील पहिला केबल-स्टेड पादचारी पूल मे महिन्याच्या अखेरीस होणार खुला

Published : May 16, 2025, 10:46 AM ISTUpdated : May 17, 2025, 03:46 PM IST
pune bridge

सार

मुठा नदीवरील केबल स्टेड ब्रिज मे महिन्याच्या अखेरीस खुला करण्याची योजना पुणे मेट्रोने आखली आहे. त्यानंतर पुणे करांना मेट्रो स्टेशनवर जाणे अधिक सोईचे होणार आहे. त्यानंतर पुणेकरांचा वेळही वाचणार आहे.

पुणे- पुणे शहरात लवकरच मुठा नदीवरील पहिला केबल-स्टेड प्रकारातील पादचारी पूल वापरासाठी खुला होणार आहे. हा पूल केवळ एक प्रवास सुविधा न राहता, नागरिकांना मेट्रो स्थानकांपर्यंत सहज पोहोचण्याचा आणि पुण्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा एक नवीन अनुभव देईल.

मेट्रोला जोडणारा तानपुरा आकाराचा पूल

चत्रपती संभाजी पार्क मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ जोडणाऱ्या या पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून मे महिन्याच्या अखेरीस तो सर्वसामान्यांसाठी खुला होईल, अशी माहिती पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.

या पुलाची रचना तानपुरा या वाद्याच्या आकारावर आधारित असून तो १७० मीटर लांब आहे. पूल असमान उंचीच्या पायलॉनवरून लटकवण्यात आलेल्या स्टील केबल्सने आधारलेला असून, यामध्ये रात्री रंग बदलणाऱ्या प्रोग्रामेबल एलईडी लाइट्स बसवण्यात आल्या आहेत. या पूलद्वारे नागरिकांना केवळ मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणं सुलभ होणार नाही, तर संध्याकाळच्या वेळेस शहराच्या मध्यभागातून मुठा नदीचं सौंदर्य अनुभवता येणार आहे.

या पुलावर एस्केलेटर आणि पायऱ्या दोन्ही सुविधांचा समावेश करण्यात आला असून, लक्ष्मी रोड, कुंठेकर रोडसारख्या मध्यवर्ती भागातून मेट्रोपर्यंत चालत पोहोचणं आता अधिक सोपं होणार आहे.

दुसरा पूल, डेक्कन स्थानक ते नारायण पेठ

पुणे मेट्रोकडून दुसरा पूल डेक्कन मेट्रो स्थानक ते नारायण पेठ जोडण्यासाठी उभारण्यात येत आहे. हा पूल १५ जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, याचा फायदा शाळा, महाविद्यालय आणि स्पर्धा परीक्षा क्लासेसना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

हा पूल १०५ मीटर लांब असून, १८ मीटर उंच कमानी (bowstring arch) असलेली रचना आहे. या पुलाची रचना मराठा मावळा पगडीपासून प्रेरित असून तो शहराच्या सांस्कृतिक ओळखीला साजेसा आहे. पूलावर ८ मीटर रुंद कांक्रीटचा फूटपाथ आणि व्ह्यूइंग डेक देखील असेल. रंग बदलणाऱ्या एलईडी लाइटिंग सिस्टिममुळे पुलावर आकर्षक प्रकाश योजना दिसणार आहे.

दोन्ही पूल शहराच्या मध्यवर्ती भागासाठी महत्त्वाचे

सध्या पुणे मेट्रोच्या डेक्कन आणि संभाजी पार्क स्थानकांचा प्रवेश केवळ जे. एम. रोडमार्गे आहे. त्यामुळे नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना मेट्रोपर्यंत पोहोचणं कठीण जात होतं. हे दोन्ही पूल नागरिकांना नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरून मेट्रोला सहज पोहोचता येईल, यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

 

तिसऱ्या पूलाचीही तयारी सुरू

पुणे मेट्रो प्रशासनाने डेक्कन आणि संभाजी पार्क या दोन मेट्रो स्थानकांमध्ये थेट फूट ओव्हरब्रिज बांधण्याचीही योजना आखली आहे. या पूलाच्या कामासाठी सध्या मुठा नदीवरील जुन्या वाहन पुलाचा वापर बंद करण्यात आला आहे.

 

पुण्याचा नागरी चेहरा बदलवणारी पायाभूत सुविधा

हे पूल केवळ पादचारी सोयीसाठी नसून, ते पुण्याच्या नागरी रचनेतील एक मोठा टप्पा ठरणार आहेत. शहराच्या ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेचा मेळ घालणारी ही पूलरचना शहराच्या सौंदर्यशास्त्र आणि वाहतुकीला नवीन दिशा देईल.

पुणे मेट्रोचा हा उपक्रम केवळ प्रवाशांसाठी सोयीस्कर पर्याय न राहता, तो नदीवर आधारित शहरी विकास, शाश्वततेचा आदर्श, आणि सांस्कृतिक प्रेरणेचा प्रतिकात्मक पूल ठरणार आहे. मे अखेरीस आणि जूनमधील उद्घाटनांनंतर हे पूल शहराच्या जीवनशैलीत मोठा बदल घडवतील, अशी अपेक्षा आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nagpur Smart City Case : स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंना क्लीन चिट; ईओडब्ल्यू व पोलिसांचा अहवाल विधानसभेत सादर
BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात