पुणे भाजपमध्ये 'घाटे' पर्व कायम! महापालिका निवडणुकीआधी शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटेंची निवड

Published : May 13, 2025, 10:54 PM IST
dheeraj ghate

सार

पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. पक्षाने राज्यभरातील ५८ शहर जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली असून, पुण्यात घाटे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेता, भाजपने शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज घाटे यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने, भाजपने तातडीने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षाने राज्यभरातील ५८ शहर जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली असून, पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटेंची निवड कायम ठेवली आहे.

भाजपने काही दिवसांपूर्वी या महत्त्वाच्या पदांसाठी निरीक्षकांची नेमणूक केली होती. पुणे शहर, मावळ, बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या निरीक्षणाची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांच्या निरीक्षणाखाली पुणे शहराध्यक्षपदासाठी मतदानही झाले.

या पदासाठी धीरज घाटे यांच्यासह माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आणि माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, धीरज घाटे यांना शहराध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने, त्यांना पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी कार्यकर्ते आणि खुद्द घाटेंनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. गेल्या आठवड्यात शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेत, निरीक्षकांनी आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला. या निवडणूक प्रक्रियेत गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आणि विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे यांची नावे आघाडीवर होती.

शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच घाटेंनी आपला कार्यकाळ वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यांच्या कार्यकाळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आल्याने, सध्याच्या कार्यकारिणीला अधिक वेळ मिळावा, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. अखेर पक्षाच्या कोअर कमिटीने धीरज घाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

२०२३ मध्ये भाजपने धीरज घाटे यांच्यावर विश्वास ठेवून पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनीही पक्षाच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवत लोकसभा निवडणुकीत भाजपला पुणे शहरातून मोठे यश मिळवून दिले. शहरातील सदस्य नोंदणी करून अनेकांना पक्षाशी जोडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले धीरज घाटे यांनी प्रचारक म्हणूनही काम केले आहे. २०१७ ते २०२२ या काळात त्यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक आणि सभागृह नेते म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक