
चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात आतल्या गोटातील संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे. एकाच पक्षातील दोन वजनदार नेते आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात दोन दिवसांत दोन तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले. मात्र या यात्रांमागे 'देशभक्ती'च्या भावनेपेक्षा अंतर्गत कुरघोडी आणि शक्तिप्रदर्शनाचा सूर अधिक जाणवला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शनिवारी चंद्रपूर शहरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. पाच किलोमीटर लांबीच्या या यात्रेत चिमूरचे आमदार बंटी भांगडिया सहभागी झाले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला सलामी देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली. पण त्यामागे राजकीय हेतू असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांत ऐकू येत होती.
जोरगेवार यांच्या यात्रेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, म्हणजे रविवारी, सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात बल्लारपूर शहरात दुसरी तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. यामुळे पक्षात दोन प्रवाह उघडपणे समोर आले. एकीकडे भारतीय सेना आणि राष्ट्रभक्तीच्या नावाने कार्यक्रम, तर दुसरीकडे उपस्थितीच्या तुलनेने ‘कोणाची यात्रा मोठी?’ याची तुलना राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुलाखतींमध्ये 'हम साथ साथ हैं' म्हणणारे नेते आता प्रत्यक्षात वेगळे दिसत आहेत. कार्यकर्तेही गट-तटांमध्ये विभागले गेले आहेत. पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि परस्पर अविश्वास यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काहींनी तर थेट “भाजपचं काँग्रेस झालंय” अशी टीकाही केली आहे. शोभाताई फडणवीस यांचं "भाजप काँग्रेस होऊ देऊ नका" हे आवाहनदेखील हवेत विरल्यासारखे वाटते.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यक्रमांना चंद्रपूरमधून आवाज देणारे, सांस्कृतिक पर्व घडवणारे मुनगंटीवार आता त्या शहरापासून दूर राहून स्वतःच्या मतदारसंघातच कार्यक्रम घेत आहेत. त्यांचा पक्षातील प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न जोरगेवार गटाकडून सातत्याने केला जात असल्याची चर्चा आहे.
तिरंगा यात्रांच्या निमित्ताने देशभक्तीच्या नावाखाली भाजपमधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्ह्यातील कमळ आता एकदिलाने उमलत नसून, त्याच्या पाकळ्या विविध दिशांना उडताना दिसत आहेत. पुढे जाऊन याचा पक्षाच्या एकात्मतेवर आणि निवडणूक तयारीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.