
बीड: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलीस दलाचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. या प्रकरणामुळे पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलिसांत एक मोठा निर्णय घेत 600 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ही मोठी हालचाल राबवली असून पोलीस कॉन्स्टेबलपासून ते ग्रेड उपनिरीक्षकांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश या बदल्यांमध्ये आहे. अनेक पोलीस कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारांशी त्यांच्या संबंधांची शक्यता वर्तवली जात होती, आणि त्या अनुषंगानेच ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर पोलिसांकडून त्वरित कारवाई झाली नसल्याने त्यांची हत्या टळली नाही, असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला होता. यामुळे पोलीस दलावर टीकेची झोड उठली होती. याच प्रकरणात काही पोलिसांना निलंबित देखील करण्यात आलं होतं.
बीड पोलीस दलातील भोंगळ कारभारावर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांच्या बदल्यांची मागणी केली होती. अखेर या मागणीला प्रतिसाद देत एकाचवेळी 600 कर्मचाऱ्यांची बदली करून पोलिस प्रशासनाने मोठा पाऊल उचललं आहे.
ही बदल्यांची लाट बीड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल, आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल, अशी प्रतिक्रिया वर्तवली जात आहे.
ही फक्त बदल्यांची कारवाई नाही, तर बीड पोलीस दलात नवा शिस्तबद्ध अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. आता पाहावं लागेल की या निर्णयाचा प्रत्यक्ष कायदा-सुव्यवस्थेवर किती प्रभाव पडतो.