
सासरच्यांकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्याने वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे, तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य असल्याने या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला बडतर्फ केले. आता या प्रकरणात हगवणे कुटुंबातील दुसऱ्या सुनेवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैष्णवीचा नवरा शशांक हा त्याच्या वहिनीला म्हणजेच मयुरी जगतापलाही मारहाण करत असे. मयुरीच्या भावाने याबाबतचे एक सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांना दिले आहे. करिष्मा आणि शशांक हगवणे यांनीच आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचे मयुरीच्या आईने सांगितले. हगवणे कुटुंबाची मोठी सून असलेल्या मयुरीला प्रचंड त्रास दिला जात होता, आणि वैष्णवीच्या लग्नानंतर हा त्रास अधिक वाढल्याचे जगताप कुटुंबाने नमूद केले.
मयुरीच्या आईने सांगितले की, "शशांक, करिश्मा, लता हगवणे यांनी माझ्या मुलीला खूप त्रास दिला. ती वेळोवेळी मला त्याबद्दल सांगायची. त्रास दिला जात असल्याचे, मारहाण होत असल्याचे ती सांगायची. सुरुवातीला मी तिची समजूत काढली आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू सगळा प्रकार सहन करण्याच्या पलीकडे गेला. आम्ही पोलीस तक्रार करायला गेलो, पण आमची तक्रार लगेच घेतली नाही."
मयुरीच्या आईने सांगितले की, "लग्नानंतर सहा महिने वैष्णवीचे कुटुंब व्यवस्थित वागले. पण नंतर त्रास सुरू झाला. करिश्मा आणि शशांकने सर्वाधिक त्रास दिला. तिच्या पतीने मात्र तिला कायम साथ दिली. ती १४ जानेवारीपासून आमच्याकडेच राहतेय. तिचे पती आमच्या घरी येऊन तिला भेटतात. सासूबाई सुरुवातीला चांगल्या वागल्या, पण नंतर त्यांचेही वर्तन बदलले."
वैष्णवीला होत असलेल्या त्रासाची सुरुवातीला कल्पना नव्हती, पण सर्वात आधी या गोष्टींची सुरुवात माझ्या बहिणीपासून झाली, असे मयुरीच्या भावाने सांगितले. "सुरुवातीला दोन वेळा आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पण पोलिसात गेल्यावर त्यांच्या गावातील कोणीतरी मध्यस्थी करायचे. तिसऱ्या वेळीही तेच झाले. रात्रीच्या वेळी आम्हाला मयुरीचा फोन आला, तिला मारहाण झाली होती. त्यावेळी बहिणीने सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. तेव्हा शशांक हगवणेने तिचा मोबाईल घेऊन पळ काढला. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे. त्यावेळी मयुरी त्याच्यामागे रस्त्यावर पळत होती. कपडे फाटलेले असतानाही मयुरी शशांकच्या मागे पळत होती," अशी माहिती देत मयुरीच्या भावाने सीसीटीव्ही फुटेज दाखवले. हे फुटेज हगवणे कुटुंबातील अत्याचाराची भयावहता दर्शवते.