Baramati Plane Crash : अजितदादांच्या अपघातग्रस्त गावाजवळ पुन्हा विमान कोसळलं; बारामतीत थरार, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

Published : May 13, 2026, 11:15 AM IST
Baramati Plane Crash

सार

Baramati Plane Crash : बारामती तालुक्यातील गोजूबावी परिसरात ‘रेड बर्ड’ कंपनीचे प्रशिक्षण विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याची घटना घडली. हवेतच इंजिन बंद पडल्याने वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान लोकवस्तीपासून दूर उसाच्या शेतात सुरक्षित उतरवलं. 

Baramati Plane Crash : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पुन्हा एकदा विमान अपघाताची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दु:खद घटनेनंतर आता त्याच परिसरात आणखी एक प्रशिक्षण विमान कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्रशिक्षणादरम्यान हवेतच बिघाड

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील ‘रेड बर्ड’ कंपनीचे पायलट ट्रेनिंग विमान आज सकाळी नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. सकाळी सुमारे ८:४० वाजण्याच्या दरम्यान गोजूबावी गावाच्या उत्तरेला दीड किलोमीटर अंतरावर असताना विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. हवेत असतानाच विमानाच्या इंजिनचा आवाज बंद पडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

 

 

 

वैमानिकाने दाखवलं प्रसंगावधान

इंजिन बंद पडल्यामुळे विमान कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शिकाऊ वैमानिकाने अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळत विमानाची दिशा लोकवस्तीपासून दूर वळवली. जवळच असलेल्या उसाच्या शेतात त्याने विमानाचे सुरक्षित ‘इमर्जन्सी लँडिंग’ केले. या अपघातात विमानाचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी

विमान खाली कोसळल्याचा आवाज ऐकताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले. वैमानिक घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी त्याला धीर देत तातडीने पोलिस आणि कंपनी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

बारामतीतील विमान सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्न

बारामती परिसरात प्रशिक्षण विमानांच्या दुर्घटना वारंवार समोर येत असल्याने आता विमान प्रशिक्षण सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ही आणखी एक घटना असल्याने नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका