
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी जोरदार टीका केली आहे.
मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या दोन दिवसांच्या अल्टिमेटमवर प्रतिक्रिया देताना बबनराव तायवाडे म्हणाले, "जर खरंच सरकार उलथवण्याची ताकद असेल, तर त्यांच्या मागे किती आमदार आहेत हे सांगावं. विधानसभा निवडणुकीत ते स्वतः किंवा त्यांचे उमेदवार का उतरले नाहीत?" त्यांच्या मते, जरांगेंनी तेव्हाच राजकीय मैदानात उतरणं योग्य होतं. आज अशा स्वरूपाची भाषा केल्याने त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
तायवाडेंनी स्पष्ट केलं की, “मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण जर त्याचा परिणाम ओबीसींच्या आरक्षणावर झाला, तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल.” त्यांनी सांगितलं की, राष्ट्रीय ओबीसी महासंघ सरकारच्या भूमिकेवर आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बारकाईने नजर ठेवून आहे.
मनोज जरांगेंनी सोमवारी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला दोन दिवसांची मुदत दिली. "२९ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणारच. सर्व मराठा समाजाने आपली कामं बाजूला ठेवून एकवटावं," असं त्यांनी ठामपणे सांगितलं. जर सरकारने याआधी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर "सरकार उलथवून टाकण्याचा निर्धार" त्यांनी व्यक्त केला.
बबन तायवाडे यांच्याआधी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघ यांसारख्या ओबीसी नेत्यांनीही जरांगेंच्या आंदोलनावर टीका केली होती. ओबीसी समाज आपल्याला अन्याय सहन करु देणार नाही, हे ओबीसी नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे.