
पुणे : परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीतील अविरत लढवय्या कार्यकर्ते, हमाल-कामगारांचे आधारस्तंभ आणि सत्यशोधकी विचारांचे कृतिशील वाहक असे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन झाले. वयाच्या ९५व्या वर्षी पूना हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते सभांमध्ये, आंदोलनांत आणि समाजकार्यात सक्रिय राहिले हीच त्यांच्या जीवनाची मोठी ओळख.
काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना चांगला प्रतिसाद असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या निधनाने पुरोगामी आंदोलनाचे एक प्रमुख स्तंभ कोसळल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
‘नाही-रे’ वर्गाच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या बाबांची ओळख म्हणजे हमाल पंचायत संघटनेचे संस्थापक आणि श्रमकऱ्यांच्या प्रश्नांचे निर्भीड प्रवक्ते.
हमाल पंचायत संघटना
रिक्षा संघटना
घरकाम करणाऱ्या महिलांसाठीचे उपक्रम
कष्टकऱ्यांसाठी सुरू केलेली झुणका-भाकरी केंद्रे
जातीय भेदभावाला छेद देणारी “एक गाव – एक पाणवठा” चळवळ
या सगळ्या चळवळींतून त्यांनी समाजपरिवर्तनाची आग निरंतर पेटती ठेवली. अनेक पुरोगामी चळवळींचे ते अविभाज्य नेतृत्व होते.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव बाबांच्या प्रत्येक भाषणात आणि कृतीत जाणवत असे. अन्यायाविरुद्ध ते कधी शांत बसले नाहीत. विषमता जिथे दिसली, तिथे त्यांची हजेरी नक्की असे. वयाच्या ९४व्या वर्षीही त्यांनी ईव्हीएमबाबतची गंभीर शंका व्यक्त करून आंदोलन छेडले आणि “लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे” असा ठाम आवाज उठवला. त्यांच्या या आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधले आणि विविध पक्षांचे नेते त्यांना भेटण्यासाठी आले. बाबा आढाव यांचे आयुष्य म्हणजे समतेच्या तत्त्वासाठी अखंड लढा आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत तितक्याच जोमात चालू राहिला.