Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा; पंढरपुरात २० लाखांहून अधिक भाविकांची मांदियाळी

Published : Jul 06, 2025, 03:56 AM ISTUpdated : Jul 06, 2025, 04:35 AM IST
vitthal mahapuja cm fadnavis

सार

Ashadhi Wari 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. २० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, दर्शन रांग २२ किलोमीटर लांब गेली आहे.

पंढरपूर : भक्तिरसात न्हालेल्या पंढरपूर नगरीत आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे अडीच वाजता संपन्न झाली. वारीच्या या ऐतिहासिक क्षणी लाखो भाविकांच्या "विठू माऊली" च्या जयघोषांनी संपूर्ण पंढरपूर दुमदुमून गेला.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील शासकीय महापूजेचा पहा व्हिडिओ

 

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून आलेल्या वारीकर्‍यांचा महापूर पंढरी नगरीत लोटला असून, यावर्षी तब्बल २० लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली आहे. चंद्रभागा नदीच्या पवित्र तीरावर स्नानासाठी पहाटेपासूनच भक्तांची गर्दी उसळली. स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी रांग लावली.

शासकीय महापूजेसाठी यंदा नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून मान देण्यात आला. गेली १२ वर्षे ते नित्यनेमाने आषाढी वारीला पंढरपूरला येत असून, त्यांची भक्ती आणि निष्ठा यांमुळे त्यांना यंदाचा हा गौरव लाभला.

मंदिर परिसरात आज भक्तांनी टाळ-मृदुंगाच्या निनादात विठ्ठलनामाचा गजर करत भक्तिभावाने दंग झालेला पाहायला मिळाला. पंढरी नगरीतील मठ-मंदिरांतून संतांची गाथा आणि हरिपाठ सुरू असून, संपूर्ण शहर भक्तीरसात न्हालं आहे.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रांग तब्बल २२ किलोमीटर लांब गेली असून, सुमारे ७५ हजारांहून अधिक भक्त दर्शनासाठी रांगेत उभे होते. या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने चोख उपाययोजना केल्या आहेत. मंदिर समितीने यावर्षी दर्शन रांगेतील भाविकांसाठी विशेष सुविधा पुरवल्या असून, वाहतुकीसाठी मंदिर परिसरात एकेरी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे चौफाळा, संत नामदेव पायरी आणि मंदिर परिसरातील गर्दीवर प्रभावी नियंत्रण ठेवता आले आहे.

या वर्षीची आषाढी एकादशी केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकतेचेही दर्शन घडवणारी ठरली. "माऊली माऊली" च्या गजरात आज पंढरपूरची वारी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक ठरली आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!