'अंडरवर्ल्ड डॉन' अरुण गवळींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, तब्बल 18 वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका

Published : Sep 03, 2025, 02:34 PM IST
Arun Gawli

सार

डॅडी म्हणून ओखळ असणाऱ्या अरुण गवळींची अखेर 18 वर्षांनंतर नागपुर तुरुंगातून सुटका झाली आहे. यानंतर आता अरुण गवळी मुंबईच्या दिशेने येण्यास निघाले आहेत. 

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईच्या गुन्हेगारी जगतात ‘डॅडी’ म्हणून ओळखल्या जाणारे अरुण गवळी अखेर १८ वर्षांनी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या आदेशानंतर शुक्रवारी सकाळी त्यांची सुटका करण्यात आली. मीडियाच्या नजरेत न येण्यासाठी गवळी यांना मागच्या गेटने बाहेर काढण्यात आले.

शिवसेना नगरसेवक खूनप्रकरणी शिक्षा

अरुण गवळी यांच्यावर वर्ष २००७ साली शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खुनाचा गंभीर आरोप होता. घाटकोपरमधील त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली आणि ते तेव्हापासून नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत होते.

सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मागील १८ वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या अरुण गवळी यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने गवळींचा जामीन मंजूर केला मात्र जामिनाच्या अटी-शर्ती ठरविण्याची जबाबदारी मुंबई सत्र न्यायालयाकडे सोपवली. त्यानंतर आदेशाची प्रत नागपूर तुरुंगात पोहोचताच त्यांची सुटका करण्यात आली आहे. 

नागपूरहून मुंबईकडे प्रयाण

सुटकेनंतर नागपूर पोलिसांनी अरुण गवळी यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले. तेथून ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. गवळींच्या सुटकेनंतर पुन्हा एकदा मुंबईतील गुन्हेगारी राजकारणातील घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अरुण गवळी कोण?

एकेकाळचे ‘अंडरवर्ल्ड डॉन’ म्हणून नावाजलेले अरुण गवळी भायखळ्याच्या चिंचपोकळीत वाढले. मुंबईतील दगडी चाळ परिसरातून गँगस्टर म्हणून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहिमविरोधी गटाचा प्रमुख चेहरा म्हणून ते पुढे आले. त्यानंतर राजकारणात प्रवेश करून ‘अखिल भारतीय सेना’ ही संघटना उभी केली आणि आमदार पदापर्यंत मजल मारली.

सुटकेनंतरच्या शक्यता

गवळी यांची सुटका झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात हालचाल सुरू झाली आहे. अरुण गवळी पुन्हा राजकीय पटलावर सक्रिय होणार का? स्थानिक पातळीवर त्याचा प्रभाव किती असेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती
Fire Department Vacancy : नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात जम्बो भरती! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 186 पदांसाठी संधी, लगेच अर्ज करा