
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोड! विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यानंतर शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींची रोकड सापडल्याने राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या रकमेचा संबंध थेट समितीचे अध्यक्ष आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्याशी जोडला जात असून, खोतकरांनी या प्रकरणावरून थेट विरोधकांवरच निशाणा साधला आहे.
धुळे येथील शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपये सापडले. हा सर्व पैसा अंदाज समितीतील आमदारांना वाटपासाठी आणल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने खोलीचं कुलूप तोडून तपासणी केली आणि रोकड सापडल्याचं उघड झालं. गोटेंच्या मते, एकूण ५ कोटींचा व्यवहार नियोजित होता. हाच आरोप म्हणजे प्रशासन व समितीला बदनाम करण्याचा डाव असल्याचा खोतकरांचा ठाम दावा आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत, खोतकर म्हणाले, "ही सगळी योजना विरोधकांची आहे. सरकार आणि समितीची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे प्रकरण उकरून काढलं जात आहे." त्यांनी संजय राऊतांनाही लक्ष केले आणि म्हणाले, "त्यांना काहीही आरोप करण्याची सवय आहे, आम्ही मात्र आमचं काम प्रामाणिकपणे करत आहोत."
या साऱ्या प्रकरणामुळे धुळे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. एकीकडे संशयाची सुई सरकारी यंत्रणेकडे वळत असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा बचाव मोहीम सुरू आहे. विश्रामगृहात एवढी मोठी रक्कम कशी आली?, ती कुणासाठी होती? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
राज्यातील विधिमंडळ समितीच्या दौऱ्यादरम्यान रोकड सापडणं ही गंभीर बाब आहे. हे फक्त विरोधकांचं कारस्थान आहे की कुणाचा मोठा आर्थिक गैरव्यवहार? हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. पण एक मात्र स्पष्ट राजकारण पुन्हा तापलं आहे!