मुंबई, ठाणे व पुणे महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार? अमित शाह यांचा संकेत

Published : May 28, 2025, 09:30 AM IST
'No One Will Be Spared': Amit Shah’s Bold Warning | Pahalgam Attack

सार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राजकरणात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Amit Shah in Mumbai : भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौर्‍यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याची शक्यता तपासण्याच्या सूचना शाह यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांची शाह यांच्याशी भेट 
अमित शाह मुंबईत वास्तव्यास असतानाच, मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सह्याद्री’ अतिथिगृहावर त्यांची भेट घेतली. या भेटीत मुंबई महापालिकेतील सुमारे १०७ प्रभागांमध्ये उमेदवार तयार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मात्र, शाह यांनी त्यांच्या मागणीवर कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याची माहिती आहे. दोघांमध्ये मुंबईसह इतर महत्त्वाच्या महापालिकांतील निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाली.

शिवसेना-भाजपच्या मागील निवडणूक युतीचे चित्र 
२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेने ८४ आणि भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. मात्र, सध्याचे राजकीय चित्र वेगळे आहे. शिवसेना दोन गटांत विभागली असून, भाजपची संघटनात्मक ताकद आणि विस्तार अधिक वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

स्थानिक निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मंजुरी दिली असून, चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने नगरविकास व ग्रामविकास विभागाला प्रभाग रचना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या संस्था किती? 
सध्या महाराष्ट्रात एकूण २९ महानगरपालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. ३४ जिल्हा परिषदांपैकी ३२ वर प्रशासक कार्यरत आहेत. याशिवाय, ३५१ पंचायत समित्यांपैकी ३३६ समित्यांवर, २४८ नगर परिषदांवर व १४७ नगर पंचायतींपैकी ४२ नगर पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.

राजकीय संदर्भात महत्त्वपूर्ण हालचाल 
या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा विचार सुरू केला आहे. अमित शाह यांनी दिलेल्या सूचनांनुसार, या ठिकाणी भाजपला स्वबळावर यश मिळवण्याची शक्यता किती आहे, याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक