
Akola News : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रचार सभेनंतर अकोल्यात मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. सभा संपल्यानंतर स्टेजकडे जमावाने धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून या घटनेत धावपळ आणि चेंगराचेंगरी झाल्याचेही पाहायला मिळाले.
अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. ओवेसी यांच्या भाषणानंतर अचानक मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक व्यासपीठाकडे धावले. कोणतेही ठोस नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि सभास्थळी मोठा गोंधळ उडाला.
परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. यामुळे सभास्थळी एकच गडबड उडाली. काही काळासाठी अफरातफर माजली असून चेंगराचेंगरी झाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांच्या संरक्षणात सभास्थळावरून माघार घेतल्याचे दिसून आले. भाषणादरम्यान लोकांना व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन करणे आणि नंतर परिस्थिती बिघडताच तात्काळ निघून जाणे, यामुळे ओवेसी आणि आयोजकांच्या बेजबाबदारपणावर टीका होत आहे.
सभेदरम्यान ओवेसी यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. अकोल्यात जन्म आणि मृत्यूचे दाखले देणे बंद करण्यात आल्याचा आरोप करत भाजप मुस्लिमांविरोधात द्वेष बाळगत असल्याचा दावा त्यांनी केला. फडणवीस-शिंदे-अजित पवार सरकारवर निशाणा साधत मुस्लिम आणि दलित भागांकडे दुर्लक्ष का केले जाते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
एमआयएम अकोल्यात 37 जागांवर निवडणूक लढवत असून यावेळी 32 उमेदवार निवडून देण्याचे आवाहन ओवेसी यांनी केले. दुर्लक्षित आणि गरीब भागांचा विकास करण्याचे आश्वासनही त्यांनी सभेत दिले.