
इंदापूर: छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमनेसामने आले. दोघेही एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने राजकीय रंग अधिक गडद झाला. मतदान केंद्रावर दादांची खास शैली पाहायला मिळाली. “नमस्ते पाटील साहेब, लक्ष असूद्या आमच्यावर,” असं म्हणताच सभोवतालचे वातावरण हलकंफुलकं झालं. त्यावर हर्षवर्धन पाटील यांनीही मिश्कील प्रत्युत्तर देत, “चांगलं ठेवलंय की!” असं म्हणत हास्याचे कारंजे उडवले.
मतदानावेळी अजित पवार यांनी मतदारांना उद्देशून सांगितलं की, “ज्यांच्याकडे कारखाना चालवण्याची धमक आहे, त्यांनाच मतदान करा.” त्यांनी ही निवडणूक केवळ राजकीय नसून, आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असल्याचंही स्पष्ट केलं. “ही एकतर्फी निवडणूक नाही. आम्ही प्रत्येक निवडणूक तुल्यबळ समजून लढतो,” असं सांगत त्यांनी आपला आत्मविश्वासही दाखवला.
“मी, माझे वडील, आजोबा आमचा संपूर्ण परिवार या कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे हा कारखाना आमच्यासाठी केवळ राजकीय नाही, तर आर्थिक दृष्टीनेही ५३ गावांसाठी महत्त्वाचा आहे,” असंही दादांनी सांगितलं.
दादांनी नुकताच झालेल्या वळवाच्या पावसाचा आणि त्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा मुद्दाही उपस्थित केला. “केळीच्या बागा, उन्हाळी पिकांचं नुकसान झालं, पण उसाला काहीसा फायदा झाला आहे. प्रशासनाला नुकसान भरपाईबाबत तातडीने सूचना दिल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकावर विचारलं असता, “माझं त्यावर बोलण्याचं काही कारण नाही. मी पुस्तक वाचलेलं नाही, नरक काय असतो हे माहिती नाही, स्वर्ग असला तर सांगेन!” असं सांगत दादांनी विषय हलक्याफुलक्या पद्धतीने टाळला.
या संपूर्ण निवडणुकीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय जुंप पुन्हा एकदा सर्वांसमोर आली. जरी दोघांनी थेट आरोप-प्रत्यारोप टाळले, तरी त्यांच्या शैलीतून आणि वक्तव्यांतून राजकीय खेळी स्पष्टपणे जाणवली.