
बीड : बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. शिवतेज नगरच्या धांडे नगरात घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला केला. शिवांशी रामेश्वर घोलप असं या मुलीचं नाव असून, तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने तब्बल बारा टाके पडले आहेत. सध्या तिच्यावर नगर नाका भागातील जनाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवायलाही पालक घाबरत आहेत.
गेल्या महिन्यातही धानोर रोडवर अशीच एक घटना घडली होती. घराच्या दारात उभ्या असलेल्या एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला होता. कुत्र्यांनी तिला रस्त्यावर ओढत नेलं होतं.
या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. इतकंच नाही, तर गेल्या आठवड्यात बीडच्या मोमीनपुरा पेठ भागातही काही नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले होते.
धांडे नगरातील या ताज्या घटनेमुळे, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रशासन अशा घटना रोखण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत आणि तातडीने कारवाईची मागणी करत आहेत. शहरातील लहान मुलं, विद्यार्थी आणि इतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.