
मुंबई : अनेक मृत्यूंच्या घटना आठवल्या की सकाळीच हार्ट अटॅक का येतो, असा प्रश्न नक्कीच पडतो. पुनीत राजकुमार यांच्यासह अनेक लोकांचा मृत्यू सकाळी आलेल्या हार्ट अटॅकमुळेच झाला. काही लोक हार्ट अटॅकला दुर्दैव मानतात. पण हा नशीब किंवा दुर्दैवाचा भाग नाहीये. शरीराची स्वतःची अशी एक लय असते. आपलं हृदय आणि संपूर्ण शरीर 'सर्केडियन रिदम' (circadian rhythm) नुसार सतत काम करत असतं. आपली रोजची दिनचर्या, हार्मोन्स, ब्लड प्रेशर आणि रक्ताभिसरण या सर्व गोष्टींवर याच रिदमचं नियंत्रण असतं. त्यामुळेच सकाळी हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यातही हिवाळ्यात तर हा धोका आणखी वाढतो.
तज्ज्ञ सांगतात की, रात्रभर झोपून आराम केलेलं शरीर जेव्हा जागं होतं, तेव्हा ते ॲक्टिव्ह होण्यासाठी तयार होत असतं. या वेळी आपला मेंदू शरीराला पुढच्या कामांसाठी सज्ज करत असतो. यामुळे सकाळी हार्मोन्सची पातळी वाढते, हार्ट रेट वाढतो आणि रक्ताभिसरणही थोडं वेगवान होतं. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. पण ज्यांच्या धमन्या आधीच अरुंद झाल्या आहेत, त्यांच्यासाठी हा बदल धोक्याचा ठरू शकतो.
डॉ. उद्गीत धीर यांच्या मते, सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त असतं. याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सकाळी शरीर जेव्हा जागं होतं आणि पुढच्या कामांसाठी तयार होत असतं, तेव्हा कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईन सारखे हार्मोन्स वाढतात. यामुळे ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट अचानक वाढतो. शिवाय रक्त थोडं घट्टही होतं, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते.
जर एखाद्या व्यक्तीच्या कोरोनरी आर्टरीमध्ये (Coronary artery) आधीच प्लाक (plaque) साचलेला असेल, तर सकाळच्या या ताणामुळे तो फुटू शकतो. प्लाक फुटल्यानंतर लगेचच रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे काही मिनिटांतच रक्ताचा प्रवाह थांबतो. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये (European Heart Journal) प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, सकाळी शरीरात होणाऱ्या या जैविक बदलांमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
सकाळी वाढलेली हार्मोन्सची पातळी हळूहळू पूर्वपदावर येते. वाढलेलं ब्लड प्रेशरही नॉर्मल होतं. डॉ. धीर सांगतात की, संध्याकाळपर्यंत शरीर जास्त आरामात असतं, ज्यामुळे धमन्यांचा अचानक त्रास होण्याचा धोका कमी होतो. याचा अर्थ असा नाही की संध्याकाळी हार्ट अटॅक येऊच शकत नाही. जर तुम्ही खूप जास्त खाल्लं, मद्यपान केलं, आणि मानसिक तणाव किंवा कामाचा सतत ताण असेल, तर संध्याकाळीही अटॅक येऊ शकतो. त्यामुळे हेल्दी जीवनशैली अंगीकारल्यास संध्याकाळचा हार्ट अटॅकही टाळता येऊ शकतो.
हार्ट अटॅकमध्ये आपली जीवनशैली खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पुरेशी झोप न घेणं, उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय, मध्यरात्री खाणं, खूप जास्त जेवणं आणि कामाचा सतत ताण यामुळे शरीराच्या जैविक घड्याळात (biological clock) अडथळा येतो. संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, पुरेशी झोप न घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे रोज एकाच वेळी उठणं, प्रमाणात खाणं आणि सकाळच्या वेळी तणाव टाळणं महत्त्वाचं आहे. सकाळी कोणतीही घाई न करता दिवसाची संथ सुरुवात केल्यास हार्ट अटॅकची भीती कमी करता येते. रोजच्या जीवनातील हे छोटे बदल शरीराला साथ देतात आणि हृदयाचं रक्षण करतात.