मोठ्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे शेफ नेहमी डोक्यावर टोपी घालतात. विशेष म्हणजे ही टोपी फक्त पांढऱ्या रंगाचीच असते. यामागे नेमकं काय कारण आहे, ते जाणून घेऊया.
स्टार हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या शेफची एक वेगळीच क्रेझ असते. किचनमध्ये स्वयंपाक करताना हे शेफ आवर्जून डोक्यावर टोपी घालतात. जसा राजासाठी मुकुट महत्त्वाचा असतो, तशीच शेफसाठी ही पांढरी टोपी महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जा, तिथे तुम्हाला शेफ लांब आणि पांढऱ्या रंगाच्या टोपीतच दिसतील. पण शेफ फक्त पांढऱ्या रंगाचीच टोपी का घालतात? काळ्या किंवा लाल रंगाची का नाही?
23
हे आहे मुख्य कारण...
किचनमध्ये पांढरी टोपी घालण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्वच्छता. जेवणात केस पडू नयेत म्हणून साधारणपणे टोपी घातली जाते. पण पांढरीच टोपी का? तर हायजीन हे त्याचं मुख्य कारण आहे. पांढऱ्या टोपीवर छोटासा डाग किंवा घाण लागली तरी ती लगेच दिसून येते. यामुळे शेफला आपली टोपी आणि कपडे वेळोवेळी स्वच्छ ठेवावे लागतात. यातून ग्राहकांचा विश्वासही वाढतो. १८ व्या शतकात फ्रान्सचे प्रसिद्ध शेफ बाउचर (Boucher) यांनी किचनमध्ये स्वच्छता राखण्यासाठी सर्व शेफनी पांढरी टोपी घालणं सक्तीचं केलं होतं. आजही तोच नियम पाळला जातो.
या टोपीला काय म्हणतात?
या आयकॉनिक पांढऱ्या टोपीला फ्रेंच भाषेत 'तोक' (Toque) किंवा 'तोक ब्लांच' (Toque blanche) असं म्हणतात. 'तोक ब्लांच' म्हणजे पांढरी टोपी.
33
टोपीच्या उंचीवरून ठरते पोझिशन
तुम्ही कधी बारकाईने पाहिलंय का? किचनमध्ये काही शेफची टोपी खूप लांब असते, तर काहींची थोडी लहान असते. जुन्या काळी किचनमधील मुख्य हेड शेफच सर्वात लांब टोपी घालायचा. फ्रान्सचे प्रसिद्ध शेफ मेरी-अँटोनी केरेम (Marie-Antoine Carême) चक्क १८ इंच लांब पांढरी टोपी घालायचे! त्यांची ती टोपी पाहून इतर शेफ त्यांच्या अनुभवाला आणि पदाला मान द्यायचे.
टोपीवर असलेल्या घड्यांचं रहस्य!
शेफच्या टोपीवर उभ्या घड्या असतात. हे फक्त डिझाईनसाठी असतं, असा तुमचा समज असेल तर ते चुकीचं आहे. पूर्वी टोपीवरील घड्यांवरून शेफचं कौशल्य मोजलं जायचं. जर टोपीला १०० घड्या असतील, तर त्या शेफला 'एका अंड्यापासून (Egg) १०० वेगवेगळे पदार्थ' बनवता येतात, असा त्याचा अर्थ असायचा.
याशिवाय, टोपीमुळे डोकं पूर्णपणे झाकलं जातं आणि अन्नाची स्वच्छता टिकून राहते. स्वयंपाक करताना गॅसजवळ तासनतास उभं राहावं लागतं. त्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर येणारा घाम जेवणात पडू नये म्हणूनही ही टोपी मदत करते. टोपी लांब असल्यामुळे आत हवा खेळती राहते आणि गरम वातावरणातही शेफचं डोकं शांत राहतं.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.