तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींवर राग येतो का? विनाकारण चिडचिड होते का? सतत थकवा, अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव किंवा हात-पायांना मुंग्या येण्याचा त्रास तुम्हाला जाणवतोय का? जर हो, तर तुम्ही या महत्त्वाच्या जीवनसत्त्वाबद्दल नक्कीच जाणून घेतलं पाहिजे.
आपले शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरज असते. यापैकी व्हिटॅमिन बी१२ खूप महत्त्वाचे आहे. आपण याला कोबालामिन असेही म्हणतो. लाल रक्तपेशींची निर्मिती, मज्जासंस्थेचे कार्य आणि डीएनए तयार करणे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये बी१२ महत्त्वाची भूमिका बजावते. शरीराला पुरेसे बी१२ मिळाले नाही, तर हळूहळू त्याची कमतरता निर्माण होते. बी१२ च्या कमतरतेमुळे शरीरात कोणते बदल होतात?
25
राग आणि चिडचिड वाढणे
तज्ज्ञांच्या मते, बी१२ ची कमतरता असताना माणसाला खूप राग आणि चिडचिड येते. विनाकारण चिडचिड होणे, छोट्या गोष्टींवरून राग येणे, इतरांशी रागाने बोलणे, भांडणे आणि मानसिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटणे असे बदल तुम्हाला दिसू शकतात. बी१२ मज्जासंस्था आणि मेंदूच्या सामान्य कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे याची कमतरता असल्यास काही लोकांमध्ये मानसिक आणि भावनिक बदल दिसून येतात. काही लोकांमध्ये एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्तीत बदल, चिंता किंवा नैराश्य अशी लक्षणेही दिसू शकतात.
35
थकवा आणि अशक्तपणा
बी१२ ची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा आणि शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखी लक्षणे दिसतात. साधी कामे केली तरी लवकर थकवा येतो आणि दिवसभर उत्साह नसणे अशा समस्या उद्भवू शकतात. बी१२ च्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि त्यामुळे ॲनिमिया (रक्तक्षय) होण्याची शक्यता असते. यामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. परिणामी थकवा, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
बी१२ च्या कमतरतेचा मज्जासंस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता असते. हात आणि पायांना मुंग्या येणे, बधीरपणा किंवा स्पर्शाची जाणीव कमी होणे असे त्रास होऊ शकतात. काही लोकांचा चालताना तोल जातो, स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो किंवा मज्जासंस्थेशी संबंधित इतर समस्या दिसतात. बी१२ ची कमतरता जास्त काळ ओळखली नाही, तर मज्जासंस्थेवरील परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो.
बी१२ ची कमतरता असताना तोंड आणि जिभेशी संबंधित काही बदलही दिसतात. जीभ लाल होणे, दुखणे किंवा सूज येणे, तोंडात फोड येणे आणि भूक कमी होणे अशी लक्षणे काहींमध्ये दिसतात. ही लक्षणे दिसल्यास उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
55
बी१२ साठी कोणते पदार्थ खावेत?
केवळ आहारात बी१२ पुरेसे नसणे हेच कारण नाही, तर शरीर बी१२ योग्य प्रकारे शोषून घेऊ न शकल्यामुळेही ही कमतरता निर्माण होऊ शकते. मांस, मासे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या पदार्थांमध्ये बी१२ नैसर्गिकरित्या आढळते. पूर्णपणे शाकाहारी असलेल्या लोकांनी बी१२ युक्त फोर्टिफाइड पदार्थ खावेत किंवा गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे फायद्याचे ठरते.