
मुंबई : घरातला कचरा, जुने कपडे, मोडक्या आणि न वापरलेल्या वस्तू आपण सहसा बाहेर फेकून देतो. पण उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या काही किनारपट्टीवरच्या गावांमध्ये याच कचऱ्याला एका अनोख्या धार्मिक परंपरेशी जोडलं गेलंय. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून, गोळा केलेला कचरा आणि जुन्या वस्तू थेट देवीला अर्पण करण्याची ही शेकडो वर्षांची जुनी परंपरा आजही पाळली जाते. होन्नावर तालुक्यातल्या कर्की गावात नुकतीच ही परंपरा पार पडली, जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. राष्ट्रीय महामार्ग-६६ जवळच्या एका मंदिराजवळ गावकरी एकत्र आले आणि त्यांनी 'वडगलज्जी' देवीला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या.
घर स्वच्छ करून कचरा देवाला अर्पण
'वडगलज्जी' परंपरेचा मुख्य उद्देश घर आणि परिसर स्वच्छ ठेवणं हा आहे, असं स्थानिक लोक मानतात. घरात वर्षानुवर्षे पडून असलेल्या न वापरलेल्या वस्तू, जुने कपडे, पिशव्या, झाडू यांसारख्या गोष्टी बाहेर काढून देवीला नवस म्हणून वाहिल्या जातात. महिला कुंकू, हळद लावून, हिरव्या बांगड्या घालून साडी, नारळ आणि इतर पूजेचं साहित्य देवीला अर्पण करतात. नैवेद्य म्हणून जेवणही दिलं जातं. काही ठिकाणी कोंबडी आणि मीठ अर्पण करण्याचीही प्रथा आहे. यासोबतच घरातल्या न वापरलेल्या वस्तूंचा देवीसमोर ढीग लावला जातो.
'कचऱ्यासोबत देवी आजारही घेऊन जाते'
वडगलज्जी ही एका गावातून दुसऱ्या गावात फिरणारी देवी आहे, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. लोकांनी घरातून काढलेला कचरा आणि जुन्या वस्तू देवीला अर्पण केल्या, तर त्यासोबत देवी गावातले आजार आणि रोगराईही दूर घेऊन जाते, असा त्यांचा विश्वास आहे. ५ सप्टेंबरला वडगलज्जी किंवा 'वडगलम्मा' देवी कर्की गावात आली होती. महालय अमावस्येपर्यंत ती तिथेच असते आणि त्यानंतर तिला महामार्गावरच्या दुसऱ्या गावात नेलं जातं, असं गावकऱ्यांनी सांगितलं.
'वडगु' म्हणजे झाडणे!
या परंपरेच्या नावामागेही एक रंजक अर्थ दडलेला आहे. उत्तर कन्नडच्या स्थानिक कन्नड भाषेत 'वडगु' म्हणजे झाडणे. त्यामुळे घर आणि आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ करण्याच्या या प्रथेला 'वडगलज्जी' हे नाव पडलंय, असं स्थानिक सांगतात.
धार्मिक श्रद्धेसोबतच आरोग्याची काळजी?
वडगलज्जी परंपरेमागे फक्त धार्मिक श्रद्धाच नाही, तर एक व्यावहारिक कारणही असू शकतं, असं स्थानिकांना वाटतं. घरात वर्षानुवर्षे न वापरलेल्या वस्तू आणि कचरा साठवून ठेवल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यानंतर घर आणि परिसर स्वच्छ करून जुन्या वस्तू बाहेर काढण्याच्या या प्रथेला हळूहळू धार्मिक परंपरेचं रूप आलं असावं, असं मत गणपती भट यांनी व्यक्त केलंय.
पूर्वी उत्तर कन्नडच्या काही भागांमध्ये पावसाळ्यानंतर वेगवेगळे ताप, कॉलरा आणि पोटाचे आजार पसरायचे, असं स्थानिक सांगतात. अशा आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी वडगलम्मा देवीला नवस बोलण्याची प्रथा सुरू झाली असावी, अशी इथली धारणा आहे.
जुन्या झाडूपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत!
वडगलज्जीला अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूंची यादीही खूप रंजक आहे. जुना झाडू, फाटके कपडे, पिशव्या, छत्र्या, शेतीची अवजारं यांसारख्या घरात न वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू देवीला वाहिल्या जातात. काळ बदलला तसा या यादीत आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही समावेश झालाय. त्यामुळे जुन्या काळातील वस्तूंसोबतच आजच्या काळातील न वापरलेल्या वस्तूही वडगलज्जीसमोर पाहायला मिळतात.
मध्यरात्री देवीची मिरवणूक
वडगलज्जीचं गावात स्वागत करतानाही एक विशेष सोहळा असतो. वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक काढली जाते. ठरलेल्या वेळेत गावकरी देवीची पूजा करतात आणि देणगी अर्पण करतात. या परंपरेचा शेवटचा दिवस आणखी खास असतो. जात, धर्म, वर्ग असा कोणताही भेदभाव न मानता गावकरी देवीला खांद्यावर घेतात, घोषणा देतात आणि पूजेचं साहित्य तसंच गोळा केलेला कचरा सोबत घेऊन मध्यरात्री महामार्गावरच्या शेजारच्या गावात जातात. त्यानंतर देवीला तिथल्या गावकऱ्यांकडे सोपवलं जातं.
गावोगावी जाताना कचऱ्याचा ढीग वाढतो
अंकोला येथील इतिहासकार श्यामसुंदर गौडा यांच्या मते, वडगलज्जीच्या प्रवासाचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक मार्ग मंजुगुनी आणि गोकर्णमार्गे अंकोलाकडे जातो. या मार्गावर गावकरी देवीला अर्पण केलेल्या वस्तू गोळा करून पुढच्या गावात घेऊन जातात. पूर्वी या वस्तू खांद्यावरून वाहून नेल्या जायच्या. आता त्या वाहनांमधून नेल्या जातात. होन्नावर आणि कुमठा भागात या देवीला वडगलम्मा किंवा वडगलज्जी म्हटलं जातं.
अंकोलामध्ये याच देवीला 'मारीहोर' या नावाने ओळखलं जातं. 'मारी' म्हणजे आजार आणि 'होर' म्हणजे ओझं किंवा गाठोडं. म्हणजेच आजारांचं ओझं वाहून नेणारी देवी, असा याचा अर्थ होतो.