मुंबई : गुलाब जामुन म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण घरी बनवताना ते तेलात फुटतात, कडक होतात किंवा आतून गुठळी राहते, अशी अनेकांची तक्रार असते. आता हे टेन्शन विसरा! इथे दिलेल्या अचूक प्रमाण आणि सिक्रेट टिप्स वापरून गुलाब जामुन बनवले, तर ते अगदी कापसासारखे मऊ होतील. पाहा ही खास रेसिपी.
खवा (मावा): २०० ग्रॅम
मैदा: १०० ग्रॅम (खव्याच्या निम्म्या प्रमाणात)
तूप: १ चमचा (पिठासाठी) + २ चमचे (पाकासाठी)
खाण्याचा सोडा: फक्त १ चिमूटभर
साखर: पाऊण किलो (किंवा ३ कप)
पाणी: पाऊण लिटर (साखरेइतकेच)
दूध: २५ मिली (पाकातील मळी काढण्यासाठी)
लिंबू: अर्धी फोड
गुलाबाच्या पाकळ्या: थोड्या (नैसर्गिक सुगंधासाठी)
तेल: तळण्यासाठी
स्फटिकासारखा स्वच्छ पाक (कॅटरर्सची सिक्रेट ट्रिक)
एका पातेल्यात साखर आणि तेवढेच पाणी घेऊन उकळायला ठेवा. पाणी उकळताना त्यात २५ मिली दूध घाला. दूध फाटून पनीरसारखं होईल आणि साखरेतील सगळी मळी, कचरा वर येईल. ही मळी काढून टाका आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. यामुळे पाकाचे स्फटिक बनणार नाहीत आणि तो काचेसारखा एकदम क्लिअर राहील.
पीठ मळण्याची पद्धत
एका ताटात खवा घेऊन तो गुठळ्या राहणार नाहीत असा चांगला मळून घ्या. त्यानंतर त्यात मैदा, १ चिमूटभर सोडा आणि १ चमचा गरम केलेलं तूप घालून मिक्स करा. थोडं थोडं पाणी शिंपडत पीठ मऊ मळून घ्या आणि ५ मिनिटे झाकून ठेवा.
तडे न जाणारे गोळे बनवा
पिठाचा गोळा आधी तळहातावर घट्ट दाबा (प्रेस करा) आणि मग हलक्या हाताने गोल आकार द्या. असं केल्याने तेलात टाकल्यावर गुलाब जामुनला तडे जात नाहीत.
तेलात तळण्याची पद्धत (सर्वांत महत्त्वाची)
कढईत भरपूर तेल घ्या आणि गॅसची फ्लेम एकदम कमी (सिम) ठेवा. गुलाब जामुन तेलात सोडल्यावर झाऱ्याने तेल सतत गोल फिरवत राहा. यामुळे गुलाब जामुन गोल फिरतात, त्यांना सगळीकडून एकसारखा गोल्डन ब्राऊन रंग येतो आणि ते आतपर्यंत छान शिजतात.
पाकात मुरवणे
तळलेले गरमागरम गुलाब जामुन आधी टिशू पेपरवर काढा आणि मग लगेच गरम साखरेच्या पाकात टाका. वरून गुलाबाच्या पाकळ्या आणि २ चमचे तूप घालून झाकून ठेवा. अर्ध्या तासात रसाळ गुलाब जामुन खाण्यासाठी तयार!
गुठळी न राहण्यासाठी: पिठात १ चमचा तूप घातल्याने गुलाब जामुनच्या आत पिठाची गुठळी राहत नाही.
मऊ आणि फुगलेले होण्यासाठी: फक्त १ चिमूटभर सोडा पुरेसा आहे. जास्त सोडा घातला तर गुलाब जामुन तेलात फुटून विरघळतात.
सतत हलवत राहा: तळताना गुलाब जामुन तेलात तसेच न सोडता सतत हलवत राहिल्यास त्यांना सगळीकडे एकसारखा रंग येतो.