
भारताच्या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी बलेनोला थेट टक्कर देणाऱ्या टोयोटा ग्लान्झावर कंपनीने ऑगस्ट महिन्यात एक मोठी ऑफर आणली आहे. या महिन्यात ग्लान्झा खरेदी केल्यास ग्राहकांना तब्बल ७०,००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.
जर तुम्ही टोयोटा सोडून इतर कोणतीही जुनी गाडी देऊन नवीन ग्लान्झा घेत असाल, तर तुम्हाला ४०,००० रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय, २५,००० रुपयांची रोख सवलत आणि सरकारी कर्मचारी किंवा ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ५,००० रुपयांची अतिरिक्त सूट आहे. या सर्वांमुळे एकूण फायदा ७०,००० रुपयांपर्यंत पोहोचतो. सामान्य परिस्थितीत ही ऑफर ६५,००० रुपयांपर्यंत मर्यादित आहे. टोयोटा ग्लान्झाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ६.४६ लाख रुपये आहे.
टोयोटा ग्लान्झामध्ये १.२ लीटर नॅचरली एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. सोबतच, कंपनी-फिटेड सीएनजी किटचा पर्यायही उपलब्ध आहे. पेट्रोल मॉडेल ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्यायांसह येतं. हे इंजिन ८९ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क निर्माण करतं. तर, सीएनजी मॉडेल फक्त मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे. सीएनजी मोडवर हे इंजिन ७६ बीएचपी पॉवर आणि ९८.५ एनएम टॉर्क देतं.
मायलेजच्या बाबतीत ग्लान्झा एक दमदार पर्याय आहे. ARAI प्रमाणित आकडेवारीनुसार, १.२ लीटर पेट्रोल मॅन्युअल आणि एएमटी व्हेरिएंट २२.३ किमी/लीटर मायलेज देतात. तर पेट्रोल-सीएनजी मॅन्युअल व्हेरिएंट तब्बल ३०.६१ किमी/किलो मायलेज देतं.
भारतीय बाजारात टोयोटा ग्लान्झाची स्पर्धा मारुती सुझुकी बलेनो, टाटा अल्ट्रॉझ आणि ह्युंदाई i20 सारख्या प्रीमियम हॅचबॅक गाड्यांशी आहे. उत्तम मायलेज, कमी मेन्टेनन्स खर्च आणि टोयोटाचा विश्वासार्ह ब्रँड यामुळे ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
गाडीच्या बाहेरील लूकबद्दल बोलायचं झाल्यास, यात एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प्ससह (DRL) एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प आणि १६-इंचाचे अलॉय व्हील्स मिळतात. रुंद ट्रॅपेझॉइडल लोअर ग्रिल, टोयोटाची सिग्नेचर फ्रंट स्टाइल आणि स्टायलिश एलईडी टेल लॅम्प्समुळे गाडीला आकर्षक लूक मिळतो.
गाडीच्या आतमध्ये ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह ९-इंचाची स्मार्ट प्लेकास्ट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. याशिवाय, हेड-अप डिस्प्ले, व्हॉईस असिस्टंट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मागच्या प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स, क्रूझ कंट्रोल, की-लेस एन्ट्री आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण यांसारखे अनेक आधुनिक फीचर्सही मिळतात.
सुरक्षेच्या बाबतीतही ग्लान्झा मागे नाही. यात ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, EBD सह ABS, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी महत्त्वाची सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. किंमत, फीचर्स आणि मायलेज यांचं उत्तम संतुलन साधून बलेनोच्या ग्राहकांना आणि कुटुंबांसाठी गाडी घेऊ इच्छिणाऱ्यांना आकर्षित करणं हे टोयोटा ग्लान्झाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
सूचना: येथे दिलेली सवलतीची माहिती विविध ऑनलाइन स्रोतांकडून मिळाली आहे. ही सूट वेगवेगळ्या राज्यांमध्ये, शहरांमध्ये, डीलरशिप्समध्ये आणि गाडीच्या स्टॉक, रंग व व्हेरिएंटनुसार बदलू शकते. त्यामुळे, गाडी खरेदी करण्यापूर्वी, अचूक माहितीसाठी तुमच्या जवळच्या स्थानिक डीलरशी संपर्क साधा.