
Yoga for Belly Fat : येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. लोकांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. यावर्षी १२व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम 'योगा फॉर हेल्दी एजिंग' अशी आहे. भारतात लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण योगामुळे या समस्येवर मात करता येते. योगामुळे फक्त वजन कमी होत नाही, तर मानसिक ताणतणावही दूर होतो. जर तुमच्या पोटावरची चरबी वाढत असेल, तर काही सोपी योगासनं करून तुम्ही ती कमी करू शकता.
कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही रोज भुजंगासन करू शकता. या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो आणि मेटाबॉलिझम सुधारतं. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा आणि दोन्ही हातांच्या मदतीने शरीराचा वरचा भाग उचला. साधारण १५ ते ३० सेकंद याच स्थितीत राहा. काही दिवसांतच तुम्हाला याचा फायदा जाणवू लागेल.
पवनमुक्तासन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटावरची चरबी कमी होण्यासही मदत होते. हे आसन करण्यासाठी, मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर गुडघे वाकवून छातीजवळ आणा. दोन्ही हातांनी पाय पकडून काही सेकंद याच स्थितीत राहा. सुरुवातीला तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच करा.
नौकासन थेट पोटाच्या स्नायूंवर काम करतं. हे आसन करण्यासाठी जमिनीवर बसा. त्यानंतर पाय आणि शरीराचा वरचा भाग वर उचलून शरीराचा नावेसारखा आकार करून बॅलन्स करा. सुरुवातीला तुम्ही बेल्टचा वापरही करू शकता. १० ते २० सेकंद नौकासन केल्याने पोटावरची चरबी कमी होऊ लागते.