
मुंबई : नवरा-बायकोचं नातं म्हटलं की त्यात प्रेम, काळजी आणि तडजोड आलीच. त्यांच्यात छोटे-मोठे वाद होणं अगदी साहजिक आहे. पण हे वाद तुम्ही कसे हाताळता, यावरच तुमच्या नात्याचा भक्कमपणा ठरतो. इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी याच विषयावर काही खास सल्ले दिले आहेत, जे सध्या खूप चर्चेत आहेत.
१. नवरा-बायकोमध्ये भांडणं होणं अगदी नॉर्मल आहे!
सुधा मूर्ती सांगतात की, वैवाहिक जीवनात नवरा-बायकोमध्ये मतभेद होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. दोन माणसं जेव्हा एकत्र राहतात, तेव्हा त्यांचे विचार, मतं आणि अपेक्षा नेहमीच सारख्या असू शकत नाहीत. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. 'आमच्यात कधीच भांडण होत नाही' असं जर एखादं जोडपं म्हणत असेल, तर ते खरंच खोटं वाटतं, असं त्या गमतीने म्हणतात. पण भांडण होणं ही समस्या नाही, तर ते भांडण किती ताणलं जातं आणि ते कसं मिटवलं जातं, हे जास्त महत्त्वाचं आहे. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्याला दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला त्या देतात.
२. एकाला राग आला की दुसऱ्याने शांत राहावं
सुधा मूर्तींनी दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला आहे. नवरा किंवा बायकोपैकी एकाला राग आला असेल, तर दुसऱ्याने लगेच रागाने उत्तर देऊ नये. त्याऐवजी परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी स्वतःच्या वैवाहिक जीवनाचं उदाहरण दिलं. नारायण मूर्तींना राग येतो, तेव्हा त्या लगेच वादात पडत नाहीत. त्या त्यांना त्यांचं म्हणणं मांडू देतात. आणि जेव्हा सुधा मूर्तींना राग येतो, तेव्हा नारायण मूर्ती शांत राहतात. दोघांनीही एकाच वेळी राग व्यक्त केला, तर छोट्याशा गोष्टीचंही मोठं भांडण होऊ शकतं. त्यामुळे एकाचा पारा चढलेला असताना दुसऱ्याने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे.
३. 'परफेक्ट कपल' असं काही नसतं!
वैवाहिक जीवनात सगळंच एकदम 'परफेक्ट' असावं, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, असं सुधा मूर्ती म्हणतात. प्रत्येक माणसात काही चांगले गुण असतात, तर काही उणिवादेखील असतात. नवरा किंवा बायकोने आपल्या अपेक्षेनुसार पूर्णपणे बदलावं, असा अट्टहास धरल्यास नात्यात तणाव वाढू शकतो. लग्न म्हणजे तडजोड आणि एकमेकांना समजून घेणं. जोडीदाराच्या चांगल्या गुणांचं कौतुक करण्यासोबतच त्यांच्यातील काही कमतरताही समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या नात्याची दुसऱ्यांच्या नात्याशी तुलना करण्यापेक्षा, एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास जपण्यावर भर दिला पाहिजे.
४. नोकरी करणाऱ्या बायकोला घरकामात मदत करा
आजकाल अनेक महिला नोकरीसोबतच घराची जबाबदारीही उत्तमरीत्या सांभाळत आहेत. ऑफिसचं काम संपवून घरी आल्यावर स्वयंपाक करणं, मुलांकडे लक्ष देणं, त्यांच्या शाळेतील मीटिंगला जाणं अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात. अशा परिस्थितीत बायकोनेच घरातील सगळी कामं करावीत, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं असल्याचं सुधा मूर्ती म्हणतात. नवऱ्यांनी आपल्या बायकोला स्वयंपाकघरात मदत केली पाहिजे आणि घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत. दोघेही कमवत असतील, तर घरकाम ही दोघांचीही जबाबदारी असली पाहिजे. बायकोच्या कामाचा आदर करण्यासोबतच तिचा शारीरिक आणि मानसिक ताणही समजून घेतला पाहिजे.
५. 'माझी आई खूप छान स्वयंपाक करायची' अशी तुलना करू नका!
काही घरांमध्ये नवरे आपल्या बायकोच्या स्वयंपाकाची तुलना स्वतःच्या आईच्या स्वयंपाकाशी करतात. सुधा मूर्तींनी या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे.पूर्वीच्या काळी ज्या महिला फक्त घर सांभाळायच्या, त्यांना स्वयंपाक आणि इतर घरकामांसाठी जास्त वेळ मिळायचा. पण आजकाल नोकरी करणाऱ्या महिला दिवसभर काम करून घरी येतात. त्यानंतर त्यांनीही अगदी तसाच स्वयंपाक करावा आणि सगळी कामं तशीच करावीत, अशी अपेक्षा ठेवणं अजिबात योग्य नाही.
'माझी आई खूप छान स्वयंपाक करायची, त्यामुळे तूही तसाच केला पाहिजेस' असा आग्रह धरणं चुकीचं आहे. दोघांची परिस्थिती आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असू शकतात, हे नवऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.