
मुंबई : आपण फ्लॉवरपासून अनेक पदार्थ बनवतो. पण गोबी रोस्ट हा अनेकांचा एकदम आवडता पदार्थ आहे. हा मसालेदार आणि झणझणीत गोबी रोस्ट तुम्ही भात, चपाती किंवा भाकरीसोबत मजेत खाऊ शकता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यातून तुम्ही हा चविष्ट गोबी रोस्ट बनवू शकता. चला तर मग, याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
सगळ्यात आधी फ्लॉवरचे छोटे तुकडे करून ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात गरम पाणी घ्या, त्यात थोडं मीठ आणि हळद टाकून फ्लॉवरचे तुकडे काही मिनिटे तसेच ठेवा. नंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. आता गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, दालचिनी आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या. आता यात बारीक चिरलेला किंवा ठेचलेला लसूण घाला आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परता.
यानंतर कढईत चिरलेला टोमॅटो घाला आणि तो चांगला शिजू द्या. टोमॅटो मऊ होऊन मसाल्यासारखा झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, काळी मिरी पावडर आणि गरम मसाला टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. आता तयार केलेले फ्लॉवरचे तुकडे कढईत टाका आणि मसाल्यात चांगले मिसळून घ्या. चवीनुसार मीठ घाला. कढईवर झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर फ्लॉवर चांगला शिजू द्या. मध्ये-मध्ये चमच्याने हलवत राहा जेणेकरून मसाला फ्लॉवरला सगळीकडून व्यवस्थित लागेल. फ्लॉवर शिजत आल्यावर झाकण काढा आणि मोठ्या आचेवर थोडा वेळ परतून घ्या. यामुळे गोबीला छान रोस्टेड चव येते. शेवटी भाजलेले काजू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा. तुमचा गरमागरम आणि मसालेदार गोबी रोस्ट खाण्यासाठी तयार आहे.
हा झणझणीत फ्लॉवर गोबी रोस्ट तुम्ही चपाती, भाकरी, पुरी किंवा भातासोबत खाऊ शकता. संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला जर घरीच हॉटेलसारखा गोबी रोस्ट बनवायचा असेल, तर ही सोपी पद्धत नक्की ट्राय करून पाहा.