
मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात 'फ्रिज' (रेफ्रिजरेटर) ही किचनमधली सर्वात महत्त्वाची वस्तू बनली आहे. अन्न खराब होऊ नये म्हणून प्रत्येकाच्या घरात फ्रिज असतोच. पण, अनेकजण जागेच्या सोयीनुसार वाटेल तिथे फ्रिज ठेवतात.
वास्तू शास्त्रानुसार, घरातल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाची एक निश्चित दिशा असते. चुकीच्या दिशेला फ्रिज ठेवल्यास घरातली सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. एवढंच नाही तर, विनाकारण खर्च वाढतो आणि आजारपणंही मागे लागतात. मग किचनमध्ये फ्रिज ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? चला तर मग, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वास्तू शास्त्राच्या नियमांनुसार, फ्रिज हे एक जड उपकरण आहे. त्यामुळे ते किचनच्या नैऋत्य (South-West) किंवा पश्चिम (West) दिशेला ठेवणं सर्वात शुभ मानलं जातं. या दिशेला जड वस्तू ठेवल्याने कुटुंबात स्थिरता आणि शांतता राहते. तसंच, आर्थिक नुकसान टाळायलाही मदत होते.
फ्रिज हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे (ज्याचा संबंध अग्नी तत्त्वाशी येतो). त्यामुळे जर नैऋत्य दिशेला जागा नसेल, तर आग्नेय कोपरा (South-East) हा दुसरा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामुळे घरातील वास्तू दोष कमी होतात आणि ऊर्जेचा प्रवाह चांगला राहतो.
किचनच्या ईशान्य (North-East) दिशेला कोणत्याही परिस्थितीत फ्रिज ठेवू नये.
ईशान्य दिशा ही जल तत्त्वाची आणि देवाची जागा मानली जाते. इथे जड वस्तू ठेवल्यास वास्तू दोष निर्माण होतो. यामुळे घरातील कर्त्या व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात.
फ्रिजचा दरवाजा उघडताना तो पूर्व (East) किंवा उत्तर (North) दिशेला उघडेल असा असावा. असं मानलं जातं की यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
फ्रिजमध्ये खराब झालेल्या, सडलेल्या भाज्या किंवा शिळं अन्न अनेक दिवस ठेवू नका. यामुळे वास्तू दोष वाढतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा येते. आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रिज स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे.