
Relationship Advice : प्रत्येक नातं हे विश्वास, संवाद आणि समजुतीवर टिकलेलं असतं. पण, अगदी परिपूर्ण वाटणाऱ्या नात्यातदेखील कधीतरी मतभेद किंवा वाद होऊ शकतो. वाद ही नात्याचा शेवट नसून, त्यातून दोघांनाही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे वाद झाला तरी त्याला शांततेनं आणि समजूतदारपणानं हाताळणं महत्त्वाचं आहे. खाली दिलेल्या 5 टिप्सद्वारे तुम्ही रिलेशनशिपमधील वाद योग्य प्रकारे हँडल करू शकता.
1. शांत राहणं आणि लगेच प्रतिक्रिया न देणं
वादाच्या क्षणी दोघांचेही मन दुखावलेलं असतं. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया दिल्यास गोष्टी आणखी बिघडू शकतात. त्यामुळे काही वेळ शांत राहा, स्वतःला थोडा वेळ द्या आणि नंतर विचारपूर्वक बोलण्याचा निर्णय घ्या. शांत राहिल्यास आपण योग्य शब्द वापरून आपली भावना स्पष्ट करू शकतो.
2. ऐकण्याची सवय लावा
बहुतेक वेळा आपण बोलण्यात इतके गुंततो की समोरच्याचं ऐकणं विसरतो. त्यामुळे वाद मिटवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकणं. समोरचा काय म्हणतोय, त्यामागची भावना काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
3. दोष देणं टाळा
वाद होताच “तू नेहमी असंच करतोस/करतेस” असे आरोप करणे टाळा. दोष देण्याऐवजी "माझं असं वाटतंय", "माझ्या भावना दुखावल्या गेल्या" अशा प्रकारे आपली बाजू मांडल्यास समोरच्याला ते अधिक चांगल्या पद्धतीने समजेल.
4. संवाद आणि समजुतीने तोडगा शोधा
कोणत्याही वादाचा शेवटी एक सकारात्मक तोडगा हवा असतो. दोघांनीही एकमेकांची मतं विचारात घेऊन समजुतीने संवाद साधा आणि दोघांसाठी योग्य निर्णय घ्या. संवाद हा कुठल्याही नात्याचा गाभा असतो.
5. क्षमाशील रहा आणि पुढे जा
एकदा वाद मिटवला की त्याचा पुन्हा उल्लेख करू नका. जर तुम्ही एकमेकांना माफ केलं असेल, तर त्या क्षणाला मागे ठेवा आणि नात्यात सकारात्मकता जपा. सतत जुन्या गोष्टी उगाळल्यास नात्यात कटुता वाढू शकते.शेवटी, नातं टिकवायचं असेल तर अहंकार नव्हे तर समजूत, संवाद आणि प्रेम अधिक महत्त्वाचं असतं. वाद येणारच, पण त्यातून नातं अधिक घट्ट होणं हेच खरं यश आहे.