
तुम्ही जर रोजच्या त्याच त्या नाश्त्याला कंटाळला असाल आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल, तर हा चविष्ट, कुरकुरीत पोहे मसाला डोसा नक्की करून पाहा. लोक सहसा पोह्यांपासून कांदेपोहे किंवा दडपे पोहे बनवतात. डोसा बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ वापरले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, की पोह्यांपासूनही तुम्ही अगदी कुरकुरीत आणि चविष्ट डोसा बनवू शकता? होय, तुम्ही पोह्यांचा डोसा बनवू शकता. हा डोसा इतका चविष्ट लागतो की एकदा खाल्लात तर तुम्ही तो पुन्हा पुन्हा बनवाल.
या डिशची खासियत म्हणजे यासाठी डोशाचं पीठ रात्रभर भिजवण्याची किंवा जास्त साहित्याची गरज नाही. तुम्ही हा डोसा घरात उपलब्ध असलेलं दही, पोहे आणि काही भाज्या वापरून बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासोबतच तुम्ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठीही हा बनवू शकता. चला तर मग, कुरकुरीत आणि चविष्ट पोहे मसाला डोसा बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
१) चविष्ट पोहे मसाला डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे मिक्सरमध्ये टाकून जाडसर वाटून घ्या. आता या वाटलेल्या पोह्यांमध्ये थोडं पाणी आणि दही टाकून पुन्हा वाटून घ्या. तयार मिश्रणात बेकिंग सोडा आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करा. तुमचं मसाला डोशाचं पीठ तयार आहे.
२) डोसा बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या. यानंतर, तयार पीठ तव्यावर ओता आणि चमच्याच्या साहाय्याने गोल आकारात पसरवा. डोसा मध्यम आचेवर शिजू द्या.
३) डोसा थोडा शिजला की त्यावर सांबार मसाला शिंपडा. मग त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि शिमला मिरची टाकून पसरवा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही घालू शकता.
४) आता डोशाच्या कडेने थोडं तेल सोडा आणि डोसा छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्यानंतर, डोसा हळूच दुमडून एका प्लेटमध्ये काढून घ्या.
५) तुमचा कुरकुरीत पोहे मसाला डोसा तयार आहे. हा डोसा खोबऱ्याची चटणी, टोमॅटो चटणी किंवा गरमागरम सांबारसोबत सर्व्ह करा. स्वत: खा आणि घरच्यांनाही खाऊ घाला.