
मुंबई : टीनएज हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा असतो. याच काळात मुलांमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर मोठे बदल घडतात. बहुतांशवेळा पालक आणि मुलांमध्ये काही कारणास्तव गैरसमजही निर्माण होतात. काही पालकांना असे वाटते की, मुलं आमच्याकडे दुर्लक्ष करतायत. दुसऱ्या बाजूला पालकांच्या बोलण्यामागील अर्थ मुलांना कळत नाही. अशातच काही वेळेस वादाची स्थिती निर्माण होते. तसेच कालांतराने नात्यात भावनिक दुरावा वाढू शकतो. तर वडीलांनी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलाला अजिबात बोलू नये याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
काही पालक मुलांसोबत बोलताना म्हणतात की, "आमच्या काळात असं नव्हतं..." किंवा "आमच्या वेळी आम्ही असं केलं...". अशी तुलना करणारी वाक्ये मुलांसाठी वडीलांनी वापरू नयेत. कारण सध्याची पिढी फार बदललेली आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात मुलाला भविष्यासाठी खंबीरपणे उभे करायचे असल्यास त्याला समजून घ्या. अन्यथा मुलं तुमच्यापासून दूरावले जाऊ शकते. याशिवाय नात्यातील संवाद कमी होऊ शकतो.
बहुतांश पालक मुलांसोबत वाद किंवा कारणास्तव खटके उडाल्यानंतर संतापात काहीही बोलतात. यावेळी काहीजण म्हणतात की, "तुला कसला आहे स्ट्रेस? आम्ही सर्वकाही देतोय?" अशा शब्दांचा वापर मुलांसाठी करणे चुकीचे आहे. यामुळे मुलं भावनिकदृष्ट्या दुखावले जातात. तसेच मुलं तुम्हाला काही शेअर करतानाही विचार करतात. अथवा शेअर करणे टाळतात. यावर उपाय म्हणून वडीलांनी मुलाला आयुष्यात कोणत्या अडचणी येत आहेत का याबद्दल विचारावे. नात्यात संवाद असणे फार महत्वाचे आहे.
रागाच्या भरात वडील कधीकधी मुलांना, "मी जे म्हणतोय ते ऐकावे लागेल. हे घर माझे आहे" असे शब्द वापरतात. या गोष्टींमुळे मुलांचे मन दुखावले जाऊ शकते. अशा परिस्थितीत मुलं तुमचा अनादर करायला लागतात. ही स्थिती उद्भवू नये म्हणून वडीलांनी चुकूनही कधी अशा शब्दांचा मुलांसाठी वापर करू नये. सातत्याने असे केल्यास मुलांमधील आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.