
(New smartphone) नवी दिल्ली : मावळत्या 2025 वर्षाला निरोप देऊन 2026 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आता आपण सारेच सज्ज झालो आहोत. पण स्मार्टफोन प्रेमींच्या दृष्टीने आगामी नवे वर्ष खास ठरणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या ब्रॅण्डच्या स्मार्टफोनची नवी मॉडेल्स बाजारात येत आहेत. त्यात ॲपलपासून मोटोरोला, व्हिवो, ओप्पोपर्यंत सर्व मोूाबाईल उत्पादक कंपन्या आहेत. प्रत्येकाने आपल्या प्रॉडक्टमध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.
OnePlus 9,000mAh क्षमतेच्या बॅटरीसह एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. अँड्रॉइड अथॉरिटीने ही माहिती उघड केली आहे. 'वोक्सवॅगन' (Volkswagen) या सांकेतिक नावाने ओळखले जाणारे हे डिव्हाइस क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 प्रोसेसरसह लॉन्च होईल, असे अँड्रॉइड अथॉरिटीच्या अहवालात म्हटले आहे. हा 9,000mAh बॅटरी असलेला फोन फ्लॅगशिप OnePlus 15 सीरिजच्या खाली असेल, असेही अहवालात नमूद केले आहे.
OnePlus च्या 9,000mAh बॅटरीसह येणाऱ्या या स्मार्टफोनचे ब्रँड नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा फोन OnePlus Nord 6 किंवा OnePlus Turbo या नावांनी ओळखला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. OnePlus हा नवीन फोन 2026 च्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात सादर करेल, अशी अपेक्षा आहे. 9,000mAh बॅटरी क्षमतेव्यतिरिक्त, या नवीन फोनमध्ये 80W फास्ट वायर्ड चार्जिंगची सुविधा देखील असू शकते. बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर एक OnePlus Turbo मॉडेल दिसले आहे. हा फोन PLU110 या मॉडेल नंबरने लिस्ट केला आहे. या माहितीमध्ये बॅटरी क्षमता आणि चिपसेटचा उल्लेख आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हा टर्बो व्हेरिएंट आगामी OnePlus फोनच आहे.
मात्र, हे OnePlus Turbo मॉडेल फक्त चीनमध्येच उपलब्ध असेल आणि भारतसारख्या इतर देशांमध्ये काही हार्डवेअर बदलांसह तो रीब्रँड करून सादर केला जाईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे, भारतात 9,000mAh बॅटरी क्षमतेच्या या फोनचे नाव OnePlus Nord 6 असू शकते. या नवीन टर्बो मॉडेलमध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 1.5K रिझोल्यूशनचा डिस्प्ले अपेक्षित आहे. हा डिस्प्ले OnePlus 15 आणि OnePlus 15R हँडसेटमध्ये वापरलेल्या डिस्प्लेसारखाच आहे. हा डिस्प्ले LTPO तंत्रज्ञान वापरेल असेही म्हटले जात आहे. टर्बो फोन मॉडेलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल असे म्हटले जात असले तरी, सेन्सर्सबद्दल तपशील अद्याप उपलब्ध नाही.