Navratri 2025 : नवरात्रीची सहावी माळ, देवी कात्यायनीची कथा, पूजा विधीसह मंत्र जपबद्दल घ्या जाणून

Published : Sep 26, 2025, 03:00 PM IST
Navratri 2025

सार

Navratri 2025 : शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. महिषासुराचा वध करण्यासाठी अवतरलेली ही देवी भक्तांना पराक्रम, धैर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचे वरदान देते.

Navratri 2025 : शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांच्या तपस्येतून जन्मलेली ही देवी महिषासुराचा वध करण्यासाठी अवतरली होती, अशी कथा सांगितली जाते. महर्षींनी कठोर तप केल्यामुळे माता पार्वती त्यांच्या ऋषिकुलात जन्माला आल्या आणि त्यांना ‘कात्यायनी’ हे नाव प्राप्त झाले. या स्वरूपात देवी अत्यंत तेजस्वी, साहसी आणि शक्तिमान आहे. सिंहावर आरूढ असलेली व चार हातांनी शस्त्र धारण केलेली ही देवी भक्तांना पराक्रम आणि धैर्याचे वरदान देते.

देवीचे स्वरूप आणि महत्त्व

देवी कात्यायनीचे स्वरूप अत्यंत दिव्य आहे. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हाताने आशीर्वाद आणि चौथ्या हाताने अभय देणारी ही देवी भक्तांच्या मनातील भीती आणि नकारात्मकता दूर करते. तिच्या पूजनाने स्त्रियांना सुखी वैवाहिक जीवन लाभते, तर ब्रह्मचर्य जीवन जगणाऱ्यांना आत्मबल आणि मनःशांती मिळते. देवी कात्यायनीचा आशीर्वाद मिळाल्याने साधकाला अध्यात्मिक उन्नतीसोबत सांसारिक सुखही लाभते.

पूजा विधी

सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. देवीची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून तिच्यावर फुलांचा, धूप-दीपाचा आणि गंधाचा अर्पण करावा. पिवळ्या किंवा लाल रंगाचे फुल देवीला प्रिय मानले जातात. देवीला मधुर नैवेद्य अर्पण करून "ॐ देवी कात्यायन्यै नमः" या मंत्राचा जप करावा. पूजनावेळी देवीसमोर दीप प्रज्वलित करून सप्तशती किंवा दुर्गा चालीसा पठण केल्यास विशेष पुण्य लाभते.

मंत्र जपाचे महत्त्व

देवी कात्यायनीची उपासना करताना मंत्र जपाचे विशेष महत्त्व आहे.मुख्य मंत्र – “ॐ देवी कात्यायन्यै नमः” हा मंत्र १०८ वेळा जपावा. यामुळे मन शुद्ध होते, वैवाहिक अडथळे  दूर होतात आणि नशीब प्रसन्न होते. विवाहित स्त्रियांना सौभाग्य लाभते, तर अविवाहित कन्यांच्या विवाहयोगाला गती मिळते. याशिवाय, साधकाचे आत्मबल वाढून तो सर्व संकटांना सामोरे जाण्यास समर्थ होतो.

कात्यायनी देवीचे पूजन हे केवळ धार्मिक विधी नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्याची प्रेरणा आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीची कृपा मिळवून भक्तांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती येते. तिच्या कृपेने साधकाचे जीवन आध्यात्मिकतेकडे वळते आणि सांसारिक जीवनही संतुलित होते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

सुनेला गिफ्ट द्यायला मार्केटमध्ये आल्या सुंदर बांगड्या, डिझाईन पाहूनच पडाल प्रेमात
हिवाळ्यात शून्य मिनिटात पटकन करा गरम, तिळाचे लाडू खाऊन व्हा ताजेतवाने