
आपल्या देशात नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. मंदिरांमध्ये देवीला फुलं, नारळ, साड्या आणि मिठाई अर्पण करून भक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करत आहेत. पण एका ठिकाणी देवीला फुलं किंवा मिठाई नाही, तर चप्पल आणि बूट नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. हे मंदिर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आहे. हे मंदिर सिद्धिदात्री देवीचं आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर ते देवीला श्रद्धेने चप्पल आणि बूट अर्पण करतात.
भोपाळच्या कोलार भागातील डोंगरावर हे सिद्धिदात्री मंदिर आहे. नवरात्रीच्या काळात या मंदिरात मोठी गर्दी होते. इथे मागितलेली इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. इच्छा पूर्ण झाल्यावर देवीला फळं किंवा फुलं नाही, तर बूट आणि चप्पल अर्पण करावे लागतात. ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. देवीजवळ नवीन चप्पल आणि बुटांचा ढीग दिसतो. आजूबाजूच्या गावातील लोक नवरात्रीत दर्शनासाठी किलोमीटरभर लांब रांगेत उभे राहतात.
देवीला चप्पल अर्पण करण्याची परंपरा खूप पूर्वी सुरू झाली. सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक भक्तांना एकसारखं स्वप्न पडलं. त्यात सिद्धिदात्री देवीने दर्शन देऊन गावातील कोणतीही महिला चप्पलशिवाय चालणार नाही, असा आदेश दिला. तेव्हाच या मंदिराचा पाया घातला गेला. तसेच, बूट आणि चप्पल अर्पण करण्याची परंपराही सुरू झाली. असं म्हणतात की, ओम प्रकाश गुप्ता यांनी हे मंदिर स्थापन केलं. १९९४ मध्ये मंदिर सुरू करण्यापूर्वी त्यांनी शिव-पार्वती विवाह सोहळा आयोजित केला होता. १९९५ मध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं.
सिद्धिदात्री माता आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते, अशी इथल्या भक्तांची श्रद्धा आहे. इच्छा पूर्ण झाल्यावर ते चप्पल अर्पण करून देवीचे आभार मानतात. तेव्हापासून ही प्रथा वाढत गेली. देवीच्या आजूबाजूला चपलांचे ढीग साचू लागले. या मंदिरात पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे ३०० पायऱ्या चढाव्या लागतात. इथे सामान्य दिवसांमध्येही रोज ५० ते ६० जोडी चप्पल-बूट देवीला अर्पण केले जातात. नवरात्रीच्या काळात तर हजारो चप्पल-बूट देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.
नैवेद्य म्हणून आणलेले चप्पल-बूट मंदिराच्या आवारात ठेवलेल्या खास पेट्यांमध्ये ठेवावे लागतात. त्यानंतर हे बूट आणि चप्पल गरीब मुलींना वाटले जातात. तसेच, ज्यांना चप्पल-बुटांची गरज आहे, त्यांनाही ते दिले जातात. ही परंपरा फक्त भोपाळपुरती मर्यादित नाही. देशभरातून लोक इथे चप्पल आणि बूट घेऊन येतात. परदेशातूनही भक्त पोस्टाने चप्पल पाठवतात. या चपला गरजू मुलींपर्यंत पोहोचतात. त्यामुळे यामागे एक चांगलं सामाजिक कारण असल्याचं भक्त मानतात. म्हणूनच सिद्धिदात्री देवीला इथे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. भोपाळला गेल्यास या देवीचं दर्शन नक्की घ्या.
भारत हा विविध धार्मिक परंपरांचा देश असून येथे अनेक मंदिरे त्यांच्या अनोख्या आणि कधी कधी विचित्र पूजा पद्धतींसाठी प्रसिद्ध आहेत. केरळमध्येही असे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे, जिथे देवी भद्रकालीची उपासना केली जाते. पण या उपासनेची पद्धत ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते, कारण येथे देवीला शिव्यांचा अभिषेक केला जातो. ही गोष्ट देवीचा अपमान नसून भक्तीचाच एक विशेष प्रकार मानली जाते.
या मंदिरात ‘कुरुंबा भगवती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रकालीच्या उग्र रूपाची पूजा केली जाते. येथे स्थापित मूर्ती सुमारे सहा फूट उंच असून तिला आठ हात आहेत. ही मूर्ती देवीच्या रौद्र स्वरूपाचे प्रतीक आहे. भक्तांना विश्वास आहे की या स्वरूपात देवीला शिवीगाळ केली की ती प्रसन्न होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते.
दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात येथे ‘भरणी’ नावाचा उत्सव साजरा होतो. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या पूजेत भक्त मोठ्या आवाजात शिव्या देतात. या अनोख्या विधीमध्ये बहुतेकदा ओरॅकल्स म्हणजेच देवीचे निवडक भक्त सहभाग घेतात. त्यांच्या मते हा विधी देवीच्या शक्तीला जागृत करून तिचा आशीर्वाद मिळविण्याचा एक मार्ग आहे.
धार्मिक कथेनुसार, रक्तबीजासुर या राक्षसाचा पराभव केल्यानंतर देवी भद्रकाली अत्यंत रौद्र स्वरूपात प्रकट झाली होती. त्या वेळी तिचा क्रोध शांत करण्यासाठी भक्तांनी शिवीगाळ केली, ज्यामुळे देवी प्रसन्न झाली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असून आजही ती भक्तिभावाने पाळली जाते.
ही अनोखी परंपरा भारतीय संस्कृतीतील विविधतेचे द्योतक आहे. श्रद्धा व्यक्त करण्याच्या पद्धती बदलू शकतात, पण भक्तीचा गाभा कायम समान राहतो, हेच या परंपरेतून स्पष्ट होते.