
Join Pain in Winter : हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास तीव्र होतो. तापमान अचानक घसरल्याने शरीरातील रक्ताभिसरण मंदावते, स्नायू आणि सांधे कडक होतात, ज्यामुळे वेदना, सुज आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो. विशेषतः वृद्ध लोक, संधिवाताचे रुग्ण आणि पूर्वी इजा झालेल्या व्यक्तींना हा त्रास अधिक जाणवतो. मात्र, दैनंदिन रुटीनमध्ये काही साधे आणि नैसर्गिक बदल करून सांधेदुखीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते.
थंडीत सांधे कडक होण्यामागे मोठे कारण म्हणजे थंडीमुळे होणारा रक्ताभिसरणाचा वेग कमी होणे. अशावेळी शरीराला उबदार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हिवाळ्यात गरम कपडे, लेग वॉर्मर्स, स्वेटर्स, हातमोजे आणि मफलरचा वापर जरूर करावा. गरम पाण्याने अंघोळ करणे, गरम पाण्याची बॉटल (Hot Water Bag) दुखऱ्या भागावर ठेवणे किंवा स्टीम घेणे यामुळेही स्नायू रिलॅक्स होतात आणि वेदना कमी होतात. सांध्यांवर गरम तेलाने हलके मसाज केल्यास stiffness कमी होऊन हालचाल सुकर होते.
थंडीच्या दिवसांत बरेचजण हालचाल कमी करतात, पण हीच सवय सांधेदुखी वाढवणारी ठरते. नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि सांधे लवचिक राहतात. सकाळी हलके स्ट्रेचिंग, योगासन, ध्यान आणि वॉकिंग यामुळे सांधे मोकळे होतात तसेच वेदनेतही आराम मिळतो. ताडासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, तितली आसन ही काही योगासने सांधेदुखीत विशेष फायदेशीर मानली जातात. मात्र, वेदना खूप असल्यास अचानक कठीण व्यायाम केल्यास त्रास वाढू शकतो, त्यामुळे सुरुवात हळूहळू करावी.
हिवाळ्यात सांधेदुखी कमी करण्यासाठी आहाराचा मोठा वाटा आहे. ओमेगा–3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन D, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा आहारात समावेश केल्यास सांधे मजबूत ठेवता येतात. बदाम, अक्रोड, जवस, मासे, हळद, आलं, लसूण, हिरव्या भाज्या आणि गरम सूप शरीराला पोषण देतात. तसेच पुरेसे पाणी पिणेही महत्त्वाचे आहे, कारण हिवाळ्यात निर्जलीकरण लवकर होते आणि यामुळे सांधेदुखी वाढते. कॅफिन आणि थंड पदार्थ कमी घेतल्यासही सुज आणि stiffness कमी राहते.
झोप पुरेशी न मिळाल्यास शरीरातील दाह वाढतो, त्यामुळे सांधेदुखीही तीव्र होते. रोज 7–8 तासांची झोप घेतल्यास शरीराला योग्य आराम मिळतो. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळावे. दिवसातून काही वेळेनंतर शरीर हालवणे, चालणे किंवा हलकी स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. वजन जास्त असल्यास गुडघे आणि कंबर सांध्यावर ताण वाढतो, त्यामुळे अतिरिक्त वजन कमी करणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार, फिजिओथेरपी किंवा सप्लिमेंट्स घेता येतात.