
नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. पण अनेकदा या विश्वासाच्या नावाखाली फसवणूक होते. तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यावर प्रेम करते. पण त्याचं वागणं वेगळंच सांगतं. बोलणं एक आणि वागणं दुसरंच. असा दुटप्पीपणा जर रोज दिसत असेल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, टॉक्सिक नात्याची सुरुवात छोट्या छोट्या खोट्या गोष्टी आणि वचनं मोडण्यापासून होते. तुम्हालाही तुमच्या जोडीदारामध्ये ही लक्षणं दिसत आहेत का?
आज भेटू, उद्या सिनेमाला जाऊ, परवा घरी ओळख करून देतो - वचनांचा भडीमार करेल. पण शेवटी एकही वचन पाळणार नाही. दरवेळी नवीन कारणं - 'ऑफिसमध्ये अडकलो', 'बरं नाहीये', 'आई रागावली'. लक्षात ठेवा, ज्याला खरोखरच तुमची काळजी असते, तो वचनं कमी देतो आणि कृती जास्त करतो. वारंवार वचनं मोडणं म्हणजे तो तुम्हाला महत्त्व देत नाही.
त्याचे मित्र, काम, इन्स्टाग्राम, फोन - या सगळ्यांनंतर वेळ उरला तरच तुम्ही. तुमचा ताप, मूड खराब असणं, नोकरीचा इंटरव्ह्यू - कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी तो व्यस्त असतो. पण त्याच्या गरजेला मात्र तुम्ही मध्यरात्रीही धावून जावं अशी त्याची अपेक्षा असते. नात्यात जर समतोल नसेल, जर फक्त तुम्हीच प्रयत्न करत असाल, तर ते प्रेम नाही, ती सवय आहे किंवा तो तुमचा वापर करतोय.
फोन नेहमी उलटा ठेवणं, तुमच्या समोर मेसेज आल्यावर डिलीट करणं, पासवर्डवरून वाद, कुठे गेला होता विचारलं की रागावणं - 'तू माझ्यावर संशय घेतेस?' - हे डायलॉग मोठे रेड फ्लॅग आहेत. नात्यात पारदर्शकता नसेल तर फसवणुकीची शक्यता ९०% वाढते. प्रायव्हसी आणि लपवाछपवी यात फरक आहे.
लग्न, करिअर, एकत्र राहणं, घरच्यांशी ओळख - हे विषय काढले की तो विषय बदलतो? 'बघूया काय होतं', 'अजून खूप वेळ आहे', 'याबद्दल आता विचार करायचा नाही' - या उत्तरांचा अर्थ असा की तो तुमच्यासोबतच्या भविष्याचा विचारच करत नाहीये. त्याला जोपर्यंत सोयीचं वाटतंय, तोपर्यंत तो फक्त वर्तमान रेटून नेतोय.
'तुला काही जमत नाही', 'तुझ्यामुळेच सगळं झालं', 'तुझ्यासारखी मुलगी/मुलगा मला खूप मिळतील' - नेहमी तुम्हाला कमी लेखणं, दोष देणं, गॅसलाईट करणं. तुम्हाला खचवून, तुमचा आत्मविश्वास नष्ट करून स्वतःच्या नियंत्रणात ठेवणं हाच त्याचा हेतू असतो. हे प्रेम नाही, हा मानसिक छळ आहे.