
एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते का, हे कसं ओळखायचं? काही लोक थेट आय लव्ह यू म्हणत नाहीत, पण त्यांच्या वागण्यातून प्रेमाची भावना व्यक्त होते. तुम्ही बोललेल्या अगदी छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्यापासून ते तुमच्यासोबत वेळ घालवण्याची संधी शोधण्यापर्यंतचे काही संकेत त्या व्यक्तीचा तुमच्यातील इंटरेस्ट दाखवून देतात. असेच ५ संकेत आज आपण पाहणार आहोत.
जर कुणाला तुमच्यात खास रस असेल, तर ते तुमचं बोलणं बारकाईने ऐकतात. विशेषतः अशा गोष्टी ज्याकडे इतर लोक फार लक्ष देत नाहीत. तुम्हाला खायला काय आवडतं, तुम्हाला कुठे फिरायला जायचंय, लहानपणीची एखादी न विसरता येण्याजोगी आठवण किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम होता, अशा आधी सांगितलेल्या गोष्टी ते पुन्हा आठवून बोलू शकतात. समजा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या इव्हेंटबद्दल सांगितलं असेल, तर तो दिवस संपल्यावर ते नक्की विचारतील की तो इव्हेंट कसा झाला. यावरून समजून घ्या की ते तुमचं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकतात.
प्रेम करणाऱ्या व्यक्तीने दिवसभर मेसेज केलेच पाहिजेत असा काही नियम नाही. पण ते तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न नक्की करतात. सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज करणं, तुम्ही कसे आहात विचारणं, एखादी मजेशीर गोष्ट शेअर करणं किंवा आधीच्या एखाद्या विषयावर पुन्हा बोलायला सुरुवात करणं अशा अनेक मार्गांनी ते संपर्कात राहतात. कधी कधी काहीही कारण नसताना ते तुमच्याशी बोलण्याची संधी शोधतात. त्याचवेळी ते तुमच्या रिप्लायचीही खूप आतुरतेने वाट पाहतात. यात मेसेजची संख्या महत्त्वाची नाही, तर त्यांचा तुमच्याबद्दलचा सततचा जिव्हाळा महत्त्वाचा असतो.
जेव्हा कुणासोबत विश्वास आणि जवळीक वाढते, तेव्हा लोक स्वतःबद्दलच्या गोष्टी शेअर करायला लागतात. सुरुवातीला साधारण गप्पा मारल्या तरी नंतर कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, लहानपणीच्या आठवणी, आयुष्यातले संघर्ष आणि भविष्यातली स्वप्नं अशा खाजगी गोष्टीही ते सांगू लागतात. त्याचबरोबर त्यांना तुमच्याबद्दलही जाणून घेण्यात उत्सुकता असते. तुमच्या आवडीनिवडी, स्वप्नं, लाईफ एक्स्पीरिअन्स आणि भविष्यातील प्लॅन्स याबद्दल ते प्रश्न विचारतात. या गप्पा फक्त टाईमपास नसतात, तर एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने असतात.
प्रेमात असणं म्हणजे दुसऱ्यावर कंट्रोल करणं असा अर्थ अजिबात नाही. जर खरी काळजी असेल, तर ते तुमच्या प्रायव्हसीचा आणि आवडीचा मान राखतात. तुम्हाला एखादा दिवस एकटं राहायचं असेल, तर ते समजून घेतील. जर तुम्ही लगेच भेटू शकत नाही असं सांगितलं, तर ते तुमच्यावर दबाव टाकणार नाहीत. तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी ते जबरदस्तीही करणार नाहीत. तसेच नात्याला लगेच एखादं नाव देण्याची घाई किंवा आपल्या भावना लगेच व्यक्त करण्याची सक्ती न करता, ते तुमच्या सोयीनुसार पुढे जाण्याचा विचार करतात. दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं हा एका हेल्दी रिलेशनचा खूप महत्त्वाचा पाया असतो.
जेव्हा कुणाला तुमच्याबद्दल ओढ असते, तेव्हा त्यांना तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो. हे त्यांच्या भविष्यातील छोट्या-छोट्या प्लॅन्समध्येही दिसून येतं. जसं की, पुढच्या आठवड्यात उघडणाऱ्या नव्या रेस्टॉरंटमध्ये आपण एकत्र जाऊया असं ते म्हणू शकतात. तुमच्या आवडत्या ठिकाणी तुम्हाला नेण्याचं प्रॉमिस करू शकतात. किंवा काही महिन्यांनंतर होणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाला तुम्हालाही सोबत बोलावू शकतात. अशा प्रकारच्या गप्पांमधून हे स्पष्ट होतं की त्यांना तुम्हाला पुन्हा भेटायला आणि वेळ घालवायला नक्की आवडेल. जर अशा गोष्टी एकदा नाही तर वारंवार होत असतील, तर त्यांचा तुमच्यातील इंटरेस्ट तुम्ही नक्कीच ओळखू शकता.
वर दिलेले ५ संकेत म्हणजे कोणीतरी तुमच्यावर प्रेम करतंच याचा १००% पुरावा नाही. काही लोकांचा स्वभावच काळजी घेणारा असतो. मैत्रीतही या गोष्टी दिसू शकतात. त्यामुळे फक्त एखाद्या कृतीवरून थेट निष्कर्षावर येऊ नका, तर त्यांचा तुमच्याशी वागण्याचा सततचा दृष्टिकोन कसा आहे हे बघा. तुमची घेणारी काळजी आणि इतरांची घेणारी काळजी यात काही फरक आहे का, हे समजून घ्या. एखाद्याच्या खऱ्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट आणि प्रामाणिकपणे बोलणं हाच सर्वात चांगला मार्ग आहे. फक्त अंदाजावर विसंबून नात्याबद्दल कोणताही घाईचा निर्णय घेऊ नका.