
Festival Calendar 2026 : वर्ष २०२६ मध्ये होळी आणि दिवाळीसारख्या अनेक सणांबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. याशिवाय मकर संक्रांती, नवरात्री, दसरा यांसारख्या इतर प्रमुख सणांबद्दल जाणून घेण्यासाठीही लोक खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला या सणांच्या निश्चित तारखा जाणून घ्यायच्या आहेत. या सणांचे तपशील पंचांगमध्ये सहज पाहता येतात. पुढे जाणून घ्या २०२६ मध्ये होळी, दिवाळी, दसरा इत्यादी प्रमुख सण कधी साजरे केले जातील…
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे हा सण १४ जानेवारीला साजरा केला जाईल, परंतु त्याचा पुण्यकाळ १५ जानेवारीला मानला जाईल. म्हणजेच १५ जानेवारीला स्नान-दान करणे श्रेष्ठ राहील.
महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात मोठा सण आहे. हा उत्सव फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. मान्यतेनुसार, याच तिथीला भगवान शिव लिंग रूपात प्रकट झाले होते. या वेळी हा सण १५ फेब्रुवारी, रविवारी साजरा केला जाईल.
होळीचा सण फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो. हा सण २ दिवस असतो. पहिल्या दिवशी होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली जाते. या वेळी होळीचे दहन ३ मार्च, मंगळवारी आणि होळीचा उत्सव ४ मार्च, बुधवारी साजरा केला जाईल.
गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. या वेळी गुढीपाडवा १९ मार्च, गुरुवारी आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होईल, जी २७ मार्चपर्यंत साजरी केली जाईल. चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ मार्चला रामनवमीचा सणही साजरा केला जाईल.
श्रावण महिना भगवान शंकराच्या भक्तीसाठी खूप खास मानला जातो. या वेळी श्रावण महिन्याची सुरुवात ३० जुलै, गुरुवारपासून होईल, जो २८ ऑगस्ट, शुक्रवारपर्यंत राहील. या दरम्यान १७ ऑगस्ट, सोमवारी नागपंचमीचा सणही साजरा केला जाईल.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हे भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. याला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या वेळी रक्षाबंधनाचा सण २८ ऑगस्ट, शुक्रवारी साजरा केला जाईल.
धर्मग्रंथानुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता, त्यामुळे दरवर्षी या तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. या वेळी हा सण ४ सप्टेंबर, शुक्रवारी देशभरात साजरा केला जाईल.
या वेळी गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर, सोमवारी आहे. या दिवसापासून १० दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात होईल. २५ सप्टेंबर, शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होईल.
अश्विन महिन्यात दरवर्षी शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो. ही वर्षातील सर्वात प्रमुख नवरात्री असते. या वेळी शारदीय नवरात्री ११ ते २० ऑक्टोबरपर्यंत साजरी केली जाईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबर, बुधवारी दसऱ्याचा सण साजरा केला जाईल.
वर्ष २०२६ मध्ये धनत्रयोदशी ६ नोव्हेंबर, शुक्रवारी, नरक चतुर्दशी ७ नोव्हेंबर, शनिवारी आणि दिवाळी ८ नोव्हेंबर, रविवारी साजरी केली जाईल. गोवर्धन पूजेचा सण ९ नोव्हेंबर, सोमवारी आणि भाऊबीज ११ नोव्हेंबर, बुधवारी साजरी केली जाईल.