पैसा असला की आयुष्य सोपं होतं, हे तर सगळ्यांनाच माहितीये. पण जसजसा पैसा वाढतो, तसतसे माणसाचे विचार कसे बदलतात? पैशाचा मेंदूवर नेमका काय परिणाम होतो? संपत्ती खरंच माणसाला बदलते का? यावर सायकॉलॉजी काय सांगते?
पैसा ही माणसाची सामान्य गरज असली तरी, तो माणसाचे विचार, निर्णय, नाती आणि वागणुकीवर मोठा प्रभाव टाकतो. पैसा माणसाला सुरक्षितता देतो. आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या व्यक्तीला उद्याची चिंता कमी असते. घरखर्च, मुलांचं शिक्षण किंवा अचानक आलेला वैद्यकीय खर्च आपण पेलू शकतो, हा आत्मविश्वास मनाला शांतता देतो. याउलट, पैशांची चणचण असलेली व्यक्ती प्रत्येक लहान खर्चाचाही दहा वेळा विचार करते. यामुळे त्यांचं लक्ष फक्त तात्काळ समस्या सोडवण्यावरच केंद्रित होतं.
25
संपत्ती वाढल्यावर काय होतं?
माणसाकडे पैसा वाढतो, तेव्हा त्याच्याकडे पर्यायही वाढतात. कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीला गरजा, किंमत आणि भविष्यातील खर्च पाहूनच निर्णय घ्यावे लागतात. पण आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तीला निर्णय घेण्याचं जास्त स्वातंत्र्य असतं. नोकरी आवडली नाही तर ती सोडणं, फिरायला जाणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करणं, अशा अनेक संधी त्यांच्याकडे असतात. हे स्वातंत्र्य कधीकधी व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतं. पण त्याच वेळी, धोका पत्करण्याची (रिस्क घेण्याची) प्रवृत्तीही वाढते.
35
इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन
पैसा माणसाचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. संपत्ती वाढल्यानंतर काही लोक त्यांच्या सामाजिक दर्जावर जास्त लक्ष केंद्रित करतात. महागड्या वस्तू, ब्रँड्स, घर किंवा गाड्या या गरजा न राहता यशाची प्रतीकं बनतात. पण सायकॉलॉजी सांगते की, जर इतरांशी तुलना करण्याची सवय लागली, तर कितीही पैसा असला तरी माणसाला समाधान मिळत नाही.
भरपूर पैसा असलेली प्रत्येक व्यक्ती स्वार्थी होते, असं मानणं चुकीचं असल्याचं सायकॉलॉजी सांगते. पैसा माणसाचा मूळ स्वभाव पूर्णपणे बदलू शकत नाही. त्याची मूल्यं, कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुभव आणि वैयक्तिक विचार हे त्याच्या वागणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात. काही लोक श्रीमंत झाल्यावर जास्त दानशूर होतात. आपल्याला मिळालेल्या संधींचा इतरांना फायदा व्हावा आणि समाजासाठी काहीतरी करावं, असं त्यांना वाटतं. तर काही लोक संपत्ती गमावण्याच्या भीतीने जास्त सावध होतात.
जेव्हा पैसा कमी असतो, तेव्हा आपला मेंदू फक्त ती कमतरता भरून काढण्यावरच विचार करतो. महिन्याअखेरीस खर्च कसा भागवायचा, कर्ज कसं फेडायचं, असेच विचार सतत मनात घोळत असतात. त्यामुळे इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं.
55
नात्यांमध्ये येणारा दुरावा
सायकॉलॉजीनुसार, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या व्यक्तीचं स्वतःच्या आयुष्यावर जास्त नियंत्रण असतं. कुठे राहायचं, काय काम करायचं, कोणासोबत वेळ घालवायचा, यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागत नाही. पण या भावनेमुळे कधीकधी 'मला कोणाचीच गरज नाही' असा विचार बळावतो. यामुळे नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते.
पैसा माणसाला बदलत नाही, तर त्याच्या प्राधान्यक्रमांना अधिक स्पष्टपणे समोर आणतो. पैशाचा वापर सुरक्षितता आणि स्वातंत्र्यासाठी केल्यास आयुष्य सुधारतं. पण पैशालाच यश आणि आनंदाचं मोजमाप बनवलं, तर मात्र समस्या सुरू होतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.