टीमने अनुवांशिकदृष्ट्या अल्झायमरचा धोका असलेल्या उंदरांचाही अभ्यास केला. या प्राण्यांमध्ये, प्रदूषित हवेच्या संपर्कामुळे समान नुकसान झालं आणि अमायलोइड प्लेक्सची (amyloid plaques) वाढ झाली, जे या आजाराचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अल्झायमरसारखे काही बदल अशा निरोगी उंदरांमध्येही दिसून आले ज्यांच्यात हे प्लेक्स नव्हते.
केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीचे सह-वरिष्ठ लेखक संजय राजगोपालन यांनी सांगितलं की, प्रदूषणामुळे मेंदूतील रोगप्रतिकारक पेशींचं काम कसं बिघडू शकतं हे यातून दिसून येतं. तर, दुसरे सह-वरिष्ठ लेखक अँड्र्यू पिपर यांच्या मते, पर्यावरणीय घटक वाढत्या वयाशी संबंधित आजारांना कसा वेग देतात, हे समजून घेण्यात हे संशोधन मदत करू शकतं.
संशोधकांनी म्हटलंय की, हे निष्कर्ष PM2.5 ला मेंदूच्या आरोग्यासाठी एक संभाव्य पर्यावरणीय धोका म्हणून दर्शवतात. मात्र, मानवी डेटा प्रदूषण आणि डिमेंशिया यांच्यातील संबंध दर्शवतो, प्रदूषणामुळे थेट हा आजार होतोच असा ठोस पुरावा नाही. उंदरांवरील प्रयोग संभाव्य जैविक प्रक्रियांविषयी पुरावे देतात, पण हे निष्कर्ष मानवांना कसे लागू होतात, हे समजून घेण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.