
पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला कधी जास्त थकवा आलाय का? किंवा नेहमीची कामं सहज करताना श्वास घ्यायला त्रास होतोय का? बरेच लोक याला धावपळीचे जीवन, ॲसिडिटी, ताणतणाव किंवा व्यायामाचा अभाव मानतात. पण ही साधी वाटणारी लक्षणे तुमच्या हृदयाच्या समस्येचा संकेत असू शकतात.
हृदयरोगाची सुरुवात नेहमी छातीत तीव्र वेदना किंवा अचानक उद्भवणाऱ्या आणीबाणीने होत नाही. कधीकधी ही लक्षणे सौम्य असतात किंवा रोजच्या समस्यांसारखी वाटतात. विश्रांती घेतल्यावर ती नाहीशी होत असल्याने त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष होते.
ही लक्षणे ओळखून वेळीच पावले उचलणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक लक्षणाचा अर्थ हृदयरोग असा होत नसला तरी, वारंवार उद्भवणाऱ्या अस्वस्थतेकडे योग्य वैद्यकीय तपासणीशिवाय कधीही दुर्लक्ष करू नये.
आपले हृदय शरीराच्या विविध भागांना रक्त आणि ऑक्सिजन पुरवते. जेव्हा त्याच्या रक्तपुरवठ्यावर किंवा पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, तेव्हा लक्षणे वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतात.
उदाहरणार्थ, हृदयाला रक्त पुरवणाऱ्या धमन्यांमध्ये फॅट्स (प्लाक) जमा होतात तेव्हा कोरोनरी आर्टरी डिसीज होतो. धमन्या अरुंद झाल्याने हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्त कमी मिळते, विशेषतः शारीरिक हालचाली करताना.
युएस नॅशनल हार्ट, लंग, अँड ब्लड इन्स्टिट्यूट (NHLBI) च्या मते, छातीत अस्वस्थता आणि धाप लागणे ही लक्षणे असू शकतात. व्यायाम करताना किंवा तणावाखाली असताना ती दिसतात आणि विश्रांती घेतल्यावर बरी होतात. म्हणूनच अनेकदा काही गंभीर गुंतागुंत होईपर्यंत कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत.
थकवा किंवा अपचनाचा प्रत्येक त्रास हा हृदयाच्या समस्येशी जोडलेला नसतो. पण काही लक्षणे नवीन असतील किंवा वारंवार येत असतील, तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
१. ॲसिडिटीसारखी वाटणारी छातीतील अस्वस्थता
छातीत दुखणे हे हृदयरोगाचे प्रमुख लक्षण मानले जाते, पण नेहमीच ती तीव्र वेदना नसते. काहींना छातीत जळजळ, दाब किंवा जडपणा जाणवतो, जे अपचनासारखे वाटू शकते.
२. पुरेशी विश्रांती घेऊनही असामान्य थकवा
कोणतंही स्पष्ट कारण नसताना सतत किंवा खूप थकवा जाणवत असेल, तर ते हृदयाच्या समस्येचे कारण असू शकते.
३. रोजच्या कामात धाप लागणे
पायऱ्या चढताना किंवा चालताना श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर हे हृदयरोगाशी संबंधित असू शकते.
४. हात, जबडा किंवा पाठीत दुखणे
हृदयविकाराच्या झटक्यात वेदना हात, मान, जबडा, पाठ किंवा पोटाच्या वरच्या भागात पसरू शकतात.
५. मळमळ किंवा पोटदुखी
छातीत दुखण्यासोबत मळमळ, घाम किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ॲसिडिटी न मानता तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
६. चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे
अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे हे असामान्य हृदयाच्या गतीमुळे होऊ शकते.
७. व्यायाम किंवा रोजची कामे करण्यात अडचण
तुमची शारीरिक क्षमता अचानक कमी होत असेल, तर त्याकडे वय किंवा व्यायामाचा अभाव म्हणून दुर्लक्ष करू नका.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असू शकतात. छातीत दुखणे हे पुरुष आणि महिला दोघांमध्येही सामान्य लक्षण आहे. पण महिलांना असामान्य थकवा, मळमळ, धाप लागणे, चक्कर येणे आणि पाठ, खांदा किंवा जबड्यात अस्वस्थता जास्त जाणवू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, वृद्ध आणि मधुमेही व्यक्तींमध्ये अपचनासारखी अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे प्रामुख्याने दिसू शकतात.
म्हणूनच केवळ छातीत तीव्र वेदना होण्याची वाट न पाहता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
खालील लक्षणांवर त्वरित आपत्कालीन उपचार करणे गरजेचे असते:
हृदयविकाराचा झटका आल्याची शंका असल्यास, तातडीने आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधा. स्वतः गाडी चालवू नका.
डॉक्टर रुग्णाची लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि धोक्याचे घटक तपासून चाचण्यांची शिफारस करतात. यामध्ये खालील तपासण्या असू शकतात:
ईसीजी (ECG): हृदयाच्या गतीमधील समस्या आणि हृदयविकाराचे संकेत ओळखण्यास मदत करते.
इकोकार्डियोग्राम: अल्ट्रासाऊंडचा वापर करून हृदयाची रचना आणि पंप करण्याची क्षमता तपासते.
रक्ताच्या चाचण्या: ट्रोपोनिन (Troponin) टेस्ट हृदयाच्या स्नायूंचे नुकसान ओळखण्यास मदत करते.
स्ट्रेस टेस्ट: शारीरिक हालचालींना हृदय कसा प्रतिसाद देते हे तपासते.
कोरोनरी इमेजिंग: हृदयाच्या धमन्यांमधील अडथळे किंवा अरुंदपणा ओळखण्यास मदत करते.
लक्षणे आणि क्लिनिकल निष्कर्षांवरून डॉक्टर योग्य चाचण्या ठरवतात. असामान्य थकवा, अपचनासारखा त्रास किंवा धाप लागणे ही हृदयरोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यास योग्य उपचार मिळण्यास मदत होते.
नियमित शारीरिक हालचालींमुळे हृदयाचे स्नायू बळकट होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा एरोबिक व्यायाम करण्याचा सल्ला देतात. यामध्ये भरभर चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यांचा समावेश आहे.
आठवड्यातून दोनदा वेटलिफ्टिंग किंवा रेझिस्टन्स बँड वर्कआऊट केल्याने चयापचय सुधारतो आणि हृदयावरील ताण कमी होतो.
रोजच्या कामातून थोडा वेळ काढून हालचाल केल्यासही खूप फायदा होतो. पण कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
डिस्क्लेमर - हा लेख केवळ माहितीसाठी आहे. वैद्यकीय उपचारांसाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.