Mini Uttapam Recipe : मुलं भाज्या खात नाहीत? मग त्यांना बनवून द्या टेस्टी मिनी उत्तप्पा

Published : Sep 29, 2026, 01:47 PM IST
Mini Uttapam Recipe : मुलं भाज्या खात नाहीत? मग त्यांना बनवून द्या टेस्टी मिनी उत्तप्पा

सार

रोजच्या त्याच त्याच नाश्त्याला कंटाळला असाल, तर मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक मिनी उत्तप्पा नक्की ट्राय करा. इडली किंवा डोशाच्या पिठात गाजर, कांदा आणि शिमला मिरची घालून हा झटपट बनवता येतो.

रोज सकाळी किंवा मुलांच्या डब्यात तेच तेच पदार्थ देण्याऐवजी, यावेळी पौष्टिक मिनी उत्तप्पा बनवून पाहा. यात चव आणि भाज्यांचे पोषण दोन्ही मिळेल. इडली किंवा डोशाच्या पिठात गाजर, कांदा, शिमला मिरची आणि कोथिंबीर घालून हा अगदी सहज बनवता येतो. मऊ उत्तप्पा, भाज्यांची चव आणि त्याचा छोटा आकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल. खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम सर्व्ह केल्यास याची चव आणखी वाढते.

पौष्टिक मिनी उत्तप्पा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

इडली/डोशाचे पीठ – २ कप

गाजर – १/२ कप (बारीक चिरलेले)

कांदा – १/२ कप (बारीक चिरलेला)

शिमला मिरची – १/४ कप (बारीक चिरलेली)

दही – १/२ कप

कोथिंबीर – २ चमचे

हिरवी मिरची – १ (बारीक चिरलेली)

मोहरी – १/२ टीस्पून

जिरे – १/२ टीस्पून

मीठ – चवीनुसार

तेल – गरजेनुसार

मिनी उत्तप्पा बनवण्याची कृती

सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात इडली किंवा डोशाचे पीठ घ्या. यात दही आणि गरजेनुसार पाणी घालून चांगलं मिक्स करा. पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या, ते थोडं घट्टच ठेवा. त्यानंतर या पिठात बारीक चिरलेलं गाजर, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. यात मोहरी, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्या.

आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा आणि त्याला थोडं तेल लावून घ्या. थोडं पीठ घेऊन तव्यावर घाला आणि मिनी उत्तप्प्याच्या आकारात थोडं जाडसर पसरवा. उत्तप्प्याच्या कडेने थोडं तेल सोडून मध्यम आचेवर भाजा. खालची बाजू सोनेरी रंगाची झाल्यावर तो अलगद पलटी करा. दुसरी बाजूही चांगली भाजून घ्या. दोन्ही बाजू छान भाजल्या गेल्या की गरमागरम उत्तप्पा ताटात काढा. खोबऱ्याच्या चटणी किंवा सांबारसोबत खायला द्या.

चव वाढवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा

उत्तप्पा मऊ हवा असेल तर पीठ जास्त पातळ करू नका. भाज्या अगदी बारीक चिरा, म्हणजे प्रत्येक घासात भाज्यांची छान चव येईल. लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात इतर भाज्याही घालू शकता. आकारानं मिनी असला तरी चवीला हा एकदम भारी लागतो! भाज्यांनी भरलेला हा पौष्टिक उत्तप्पा फक्त सकाळच्या नाश्त्यासाठीच नाही, तर मुलांच्या डब्यासाठीही एक उत्तम पर्याय आहे. घरी एकदा नक्की बनवून पाहा, घरचे पुन्हा पुन्हा हाच नाश्ता मागतील यात शंका नाही!

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Cucumber Benefits : काकडी सालासह खावी की सोलून? जाणून घ्या योग्य पद्धत
Old Photos : तुमच्या घरातल्या जुन्या फोटोंमध्ये लपलेल्या ७ रंजक गोष्टी!